बोईसर विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांकडून आपली सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. बोईसर येथील एका पक्षाच्या निवडणूक कार्यालयाचा परिसर चक्क ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून साफसफाई करून घेतला असून निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनामुळे मात्र सरावलीचा मुख्य रस्त्यालगतचा परिसर स्वच्छ झाला आहे.
सत्तेचा वापर कसा आणि कुठे केला जाऊ शकतो याचा काही नेम नाही. बोईसर विधानसभा निवडणुकीतही असाच प्रकार घडला असून सरावली ग्रामपंचायत हद्दीत शिवसेनेच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करताना मंडपातील व मंडपाच्या समोरचा परिसर स्वच्छ करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी आपली सत्ता असलेल्या सरावली ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांना कामाला लावले होते. शिवसेना संपर्कप्रमुख रवींद्र फाटक हे प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी येणार असल्याने प्रचार कार्यालयाचा परिसर टापटीप करण्यात आला होता.
कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करून घेतली असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. कर्मचाऱ्यांना कुणी पाठवले याबाबत मला कोणत्याही प्रकारची माहिती नाही. – सुभाष किणी,ग्रामविकास अधिकारी, सरावली