Premium

“नवाब मलिक सत्तेत हवेत पण…”, फडणवीसांच्या पत्रावर काँग्रेसचा टोला; म्हणाले, “मी मारल्यासारखं करतो…”

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नवाब मलिकांच्या अजित पवार गटाला पाठिंबा देण्यावरून सरकारला कोंडीत पकडलं.

Fadnavis Ajit pawar Nawab malik
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलेल्या पत्रावर विजय वडेट्टवार यांची प्रतिक्रिया.

भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीबरोबर सत्तेत असताना नवाब मलिक यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्यांच्यावर देशद्रोहासह, दाऊद इब्राहिम आणि त्याच्या बहिणीला मदत केल्याचेही आरोप केले होते. त्यानंतर आमदार नवाब मलिक तुरुंगातही गेले. ते तुरुंगात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फूटला. अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन वेगवेगळे गट बनले. दरम्यान, नवाब मलिक हे वैद्यकीय कारणांमुळे तुरुंगातून बाहेर आले आहेत. अशातच गुरुवारी (७ डिसेंबर) ते विधीमंडळाच्या अधिवेशनात सहभागी झाले. नवाब मलिक विधानसभेत सत्तेत असलेल्या अजित पवार गटाबरोबर बसणार की, विरोधी बाकावर असलेल्या शरद पवार गटातील आमदारांबरोबर बसणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. दरम्यान, नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवत सत्ताधारी बाकावर बसणं पसंत केलं. यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने आणि काँग्रेसने भाजपाला कोंडीत पकडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नवाब मलिकांवरून सरकारला धारेवर धरलं. दानवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले, तुम्ही ज्याचे दाऊद इब्राहिमशी संबंध जोडले, ज्याला देशद्रोही म्हटलं आज त्याच्याच मांडीला मांडी लावून बसलेले आहात. त्यानंतर फडणवीसांनी ठाकरे गटाला काही प्रश्न करत सरकारची बाजू रेटून धरली. परंतु, विधीमंडळाचं आजच्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर फडणवीस यांनी नवाब मलिक प्रकरणावरून अजित पवार यांना एक पत्र लिहिलं आहे.

अजित पवारांना पाठवलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, “नवाब मलिक यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही. मलिक हे केवळ वैद्यकीय कारणांमुळे मिळालेल्या जामीनावर तुरुंगाबाहेर आहेत. परंतु, वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्यांच्यावर असताना त्यांना महायुतीचा भाग करणं योग्य ठरणार नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्रावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही यावरून फडणवीस आणि अजित पवार यांना टोला लगावला आहे. वडेट्टीवार यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर… नवाब मलिकांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलेल्या पत्राबाबत असंच काही म्हणावं लागेल.

हे ही वाचा >> नवाब मलिकांवरून महायुतीत मतभेद? फडणवीसांच्या पत्रापाठोपाठ शिंदे गटानेही सुनावलं; म्हणाले, “अजित पवारांमुळे…”

वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, नवाब मलिक यांना पुरवणी मागण्यात महायुती सरकारनेच निधी दिला. आता ते आमच्याबरोबर नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. भाजपावर आरोप होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र जारी केलं आहे. देशद्रोही म्हणून नवाब मालिकांचा उल्लेख भाजपा आणि शिंदे गटाने केला आहे. देशद्रोही माणूस म्हणून विधानसभेत आपण ज्यांचा उल्लेख केला सत्तेसाठी त्याच माणसाला आपण बाजूला बसवलं तर जनता टीका करेल या भीतीने ते आपल्याबरोबर हवेत पण जवळ नको अशी स्थिती भाजपाची झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vijay wadettiwar says bjp wants nawab malik with them but not ready for criticism asc

First published on: 07-12-2023 at 21:21 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा