नंदुरबार जिल्ह्यात गुरुवारी दुपारी जमिनीवरून अतिशय कमी उंचीवरून गेलेल्या विमानाने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आणि त्याची खातरजमा करता-करता पोलीस व जिल्हा प्रशासन यंत्रणेची एकच धावपळ उडाली. अखेरीस सायंकाळी उशिरा नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीत कोणतीही दुर्घटना घडली नसल्याचे निष्पन्न झाल्यावर यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला, परंतु अतिशय कमी उंचीवरून जाणारे हे विमान मध्य प्रदेशच्या हद्दीत कुठे अंतर्धान पावले, याची स्पष्टता रात्री उशिरापर्यंत होऊ शकली नाही. हवाई दलाच्या जनसंपर्क विभागाने अशी कोणतीही घटना त्यांच्या विमानाबाबत घडली नसल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे मुंबईच्या हवाई नियंत्रण कक्षाने सर्व विमानांची वाहतूक सुरक्षित असल्याचे नंदुरबार जिल्हा प्रशासनास कळविले असले तरी कमी उंचीवरून उडालेल्या विमानाचा शोध घेण्यात येत असल्याचे म्हटले आहे. आदिवासीबहुल नंदुरबार हा गुजरात व मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेला जिल्हा. गुरुवारी दुपारी नंदुरबार, शहादा तालुक्याच्या परिसरातून अतिशय कमी उंचीवरून विमान गेल्याचे सांगितले जाते. त्याची उंची व प्रचंड आवाज लक्षात घेऊन हे कुठे कोसळले की काय, अशी धास्ती ग्रामस्थांना वाटली. त्यातील काही जणांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि अवघ्या काही मिनिटांत विमान कोसळल्याची अफवा पसरली.  शहादा तालुक्यातील समशेरपूर परिसरात या विमानाचा अधिक आवाज आल्याचे सांगण्यात येत होते. पोलीस व जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसरात शोध मोहीम राबविली.  या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अशी कोणतीही दुर्घटना घडली नसल्याचे सांगितले. जमिनीच्या अगदी कमी उंचीवरून गेलेले हे विमान पुढे मध्य प्रदेशच्या खेतिया जिल्ह्यात गेल्याचे सांगितले जाते. त्याचे पुढे काय झाले हे सांगता येणे अवघड असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांनी जिल्हा प्रशासनाने मुंबईच्या हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून असे कोणते विमान भरकटले नसल्याची खातरजमा केल्याचे नमूद केले. हवाई नियंत्रण कक्षाद्वारे जमिनीवरून अतिशय कमी उंचीवरून उडालेल्या (लो फ्लाईंग) विमानाचा शोध घेत असल्याचे बकोरिया यांनी सांगितले. या गोंधळात काही जणांनी ते हवाई दलाचे विमान असावे, असाही अंदाज व्यक्त केला. त्या पाश्र्वभूमीवर हवाई दलाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर जेरॉल्ड गॅलवे यांनी हवाई दलाच्या विमानाबाबत अशी दुर्घटना घडली नसल्याचे ‘लोकसत्ता’कडे स्पष्ट केले. या एकूणच स्थितीवरून, कमी उंचीवरून उडालेल्या विमानाची खातरजमा करता-करता पोलीस व जिल्हा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.