गजानन कीर्तिकरांना हटविले
सोलापूर जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुखपदावरून माजी गृहराज्यमंत्री गजानन कीर्तिकर यांना हटवून त्यांच्या जागेवर विश्वनाथ नेरूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेरूरकर हे यापूर्वी २००३ ते ७ या कालावधीत जिल्हा सेना संपर्कप्रमुखपदावर कार्यरत होते. त्यांच्यावर आता दुसऱ्यांदा या पदावर सोलापूरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मुंबईत शिवसेना भवनात सेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्य़ातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी ठाकरे यांनी सोलापूरच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदावर कीर्तिकर यांच्याऐवजी नेरूरकर यांच्या नियुक्तीची घोषणा केली. यावेळी जिल्ह्य़ाचे सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्यासह जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शहरप्रमुख प्रताप चव्हाण, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वानकर, शाहू शिंदे, सदानंद येलुरे, सुनील शेळके, महाराष्ट्र कामगार सेनेचे सरचिटणीस विष्णू कारमपुरी, माजी आमदार शिवशरण पाटील आदींची उपस्थिती होती.
विश्वनाथ नेरूरकर यांनी यापूर्वी २००३ ते ७ या कालावधीत सोलापूरच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली होती. पक्षसंघटनेवर मजबूत पकड, संघटनकौशल्य व मुत्सद्देगिरीच्या जोरावर नेरूरकर यांनी जिल्ह्य़ात सेनेची पक्षबांधणी चांगल्याप्रकारे केली होती. विशेषत: २००४ च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर सोलापूरसह बार्शी व करमाळा या तीन मतदारसंघांतून सेनेचे आमदार निवडून आले होते. नंतर झालेल्या दक्षिण सोलापूर तालुका विधानसभा पोटनिवडणुकीत सेनेचे रतिकांत पाटील यांच्या रूपाने जिल्ह्य़ात सेनेला चौधा आमदार निवडून आणता आला होता. याशिवाय उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीतही नेरूरकर यांच्या संघटन कौशल्यामुळे सेनेच्या कल्पना नरहिरे या निवडून आल्या होत्या. आता पुन्हा आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर नेरूरकर यांच्यावर सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्य़ांची जबाबदारी सोपविण्यात आल्याने शिवसैनिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. विशेषत: सध्या जिल्ह्य़ात शिवसेनेत गटबाजी उफाळून आली असून ही गटबाजी दूर करण्यात नेरूरकर हे यशस्वी होतील आणि सेनेला मोठी ताकद मिळवून देतील, अशी अपेक्षा सेनेच्या वर्तुळात व्यक्त होत आहे.