अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे १६ फेब्रुवारीला व्हिजन रायगड या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबागच्या कुरुळ येथील क्षात्रक्य माळी समाज सभागृहात दुपारी ३.३० वाजता या परिसंवादाला सुरुवात होणार आहे.
रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे, खासदार अनंत गिते, शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि काँग्रेस आमदार प्रशांत ठाकूर यानिमित्ताने आपले राजकीय मतभेद विसरून एकत्र येणार आहेत. जिल्ह्य़ाच्या विकासाबाबतच्या आपल्या संकल्पना काय, आपल्या राजकीय पक्षांची त्याबाबतची धोरणे कोणती, यावर सविस्तर विश्लेषण ते करणार आहेत.
 या परिसंवादात उपस्थितांना आपले प्रश्न लोकप्रतिनिधींना विचारण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. हे प्रश्न लेखी स्वरूपात कुलाबा दर्पण, श्रुती सारंग सोसायटी, ब्राह्मण आळी, अलिबाग, जिल्हा रायगड या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पवार यांनी केले आहे.
मात्र हे प्रश्न राजकीय अथवा वैयक्तिक नसावेत, केवळ विकासात्मक प्रश्नांनाच परिसंवादात स्थान दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जास्तीत जास्त लोकांनी या परिसंवादात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.