जैतापूर येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी आज ताब्यात घेऊन थोडय़ा वेळाने सोडून दिले. त्यामुळे या परिसरातील संभाव्य हिंसाचार टळला. या प्रकल्पाला माडबन, जैतापूर, मिठगवाणे, साखरीनाटे इत्यादी परिसरांतील मच्छिमार आणि शेतकरी गेली काही वष्रे सातत्याने विरोध करत आहेत. १८ एप्रिल २०११ रोजी येथे उसळलेल्या हिंसक आंदोलनात तबरेज सायेकर या तरुणाचा मृत्यू ओढवला होता. त्यानंतर मोठे आंदोलन झाले नव्हते. या पाश्र्वभूमीवर आज प्रकल्पस्थळाला घेराव घालण्याचा निर्धार आंदोलक नेत्यांनी जाहीर केल्यामुळे गेले काही दिवस या परिसरात तणावाचे वातावरण होते. मागील हिंसाचाराचा अनुभव लक्षात घेऊन पोलिसांनीही प्रचंड फौजफाटा या परिसरात तैनात केला होता. त्यासाठी रत्नागिरीसह ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ातूनही जादा कुमक तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ा मागवण्यात आल्या होत्या.  सर्व आंदोलक सकाळी प्रकल्पस्थळाकडे निघाल्यानंतर मिठगवाणे फाटय़ाजवळ पोलिसांनी त्यांना अडवले. तेथे आंदोलनाच्या नेत्यांनी प्रकल्पाच्या विरोधात निषेध सभा घेतली. संचारबंदी लागू केलेली असूनही पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळत सभेला विरोध केला नाही. सभेनंतर आंदोलकांनी अटक करून घेतली. त्यांना नाटे येथील शाळेत नेऊन थोडय़ा वेळाने वैयक्तिक बाँडवर सोडून देण्यात आले.  शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, कम्युनिस्ट इत्यादींनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. या पक्षांचे नेते आंदोलनस्थळी उपस्थित होते. त्यांनी सभेत भाषणेही केली. पण त्यांचे कार्यकर्ते अतिशय अल्पसंख्येने सहभागी झाले होते. अपेक्षेनुसार मच्छिमार नेते अमजद बोरकर यांच्या नेतृत्वाखालील मच्छीमारांचाच आंदोलकांमध्ये मोठा भरणा होता.  दरम्यान दर महिन्याला प्रकल्पग्रस्त आंदोलन करतील, असा इशारा जनहित सेवा समितीचे नेते प्रवीण गवाणकर यांनी दिला आहे.