शाळकरी मुलाचा पाणी काढताना तोल गेल्याने मृत्यू; यंत्रणेच्या बेपर्वाईमुळे गावात संतप्त प्रतिक्रिया
तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आता पाणीटंचाईची समस्या डोके वर काढू लागली असून पाणीटंचाईच्या समस्येमुळे वळवाडी येथील राहुल मांगू पाटील (१४) या शाळकरी मुलाचा बळी जाण्याचा दुर्दैवी प्रकार बुधवारी सकाळी घडला. दोन वर्षांपूर्वी या गावात पाणीटंचाईमुळे एका महिलेला अशाच प्रकारे जीव गमवावा लागला, तेव्हा सुस्त असलेली सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली होती. त्यातून कोणताही बोध न घेणाऱ्या या यंत्रणेच्या बेपर्वाईमुळे आता त्याच प्रकारची पुनरावृत्ती झाल्याने गावात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.
वळवाडी गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांवर भटकंतीची वेळ आली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास गावालगतच्या सार्वजनिक विहिरीवर राहुल पाणी भरण्यासाठी गेला होता. विहिरीतून पाणी काढत असताना तोल गेल्याने तो आतमध्ये पडला. त्या वेळी तेथे असलेल्या दोघांना पोहता येत नसल्याने त्यांनी अन्य लोकांकडे मदतीसाठी धावाधाव केली. परंतु याच वेळी लग्नाचा मांडव टाकण्याच्या कार्यक्रमासाठी गावातली बरीचशी मंडळी विहिरीपासून दूर असल्याने तातडीने मदत मिळू शकली नाही. मांडवाच्या ठिकाणी ही वार्ता समजल्यावर धावत आलेल्या गावकऱ्यांनी पाण्यात बुडालेल्या राहुलला विहिरीतून काढून येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आठव्या इयत्तेत शिकत असलेला राहुल हा तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. तीन-चार वर्षांपासून शेतातून फारसे उत्पन्न येत नसल्याने कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी दिवसभर शेतात राबणारे त्याचे पिता मांगू पाटील हे रात्री मालेगाव येथील एका जैन मंदिरात पहारेकरी म्हणून काम करतात. अशा या कुटुंबावर कोसळलेल्या संकटामुळे वळवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून गावात पाणीटंचाई निर्माण झाली असताना प्रशासन ढिम्म राहिले व त्यात या बालकाचा हकनाक बळी गेल्याने गावात संतापाची भावना निर्माण झाली आहे. यावर विचारविनियम करण्यासाठी गुरुवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मधुकर पाटील यांनी दिली.