आज विधानसभेचे जे अध्यक्ष बसले आहेत ते आधी आमच्या बरोबर म्हणजेच शिवसेनेत होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले, आता भाजपासह गेले आहेत त्यांचे खास मित्र झालेत आता बहुदा काँग्रेसमध्ये जातील. म्हणजे त्यांचा पुढचा पक्ष काँग्रेस असेल असा टोला आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणातून राहुल नार्वेकर यांना लगावला आहे. हे अध्यक्ष महोदय वर्षा बंगल्यावर जाऊन काय करत होते? न्यायमूर्ती कधी आरोपीच्या घरी जातात? हे तुम्ही पाहिलं आहेत का? आता त्यांच्याकडून न्याय किती अपेक्षित ठेवायचा ते माहीत नाही.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

आम्ही न्याय मागत आहोत तो तुमच्याकडून मागत आहोत. कारण महाराष्ट्राची जनता आहे आणि आम्ही आहोत आपल्या सगळ्यांचा विश्वास बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलं आहे त्यावर आहे. गद्दारांनी राजीनामा द्यायला हवा होता आणि निवडणुकीला सामोरं जायला हवं होतं. पण त्यांच्यात ही हिंमत नव्हती म्हणून ते मंत्री झाले. १० तारीख म्हणजेच बुधवारचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण बुधवारचा निर्णय आपल्या बाजूने लागला, गद्दार बाद झाले तर समजायचं की हे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालले आहेत. पण उलटा निर्णय लागला तर मग तुम्ही लक्षात घ्या की २०२४ मध्ये भाजपाला जे संविधान लिहायचं आहे त्या दिशेने हे चालले आहेत. एका बाजूला भाजपाचं संविधान आहे दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आहे तुम्ही कोणतं निवडणार? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

घटनाबाह्य मुख्यमंत्री खुर्ची घट्ट धरुन बसले आहेत

घटनाबाह्य मुख्यमंत्री आपली खुर्ची घट्ट धरुन बसले आहेत. काही खुर्चीवर चढण्याचा प्रयत्न करत आहेत. जॅकेट घालून तयार आहेत. ही सगळी सर्कस सुरु असली तरीही घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेत लोक कमी पडतात आणि खुर्च्या जास्त फिरतात. गेल्या दोन वर्षात आपण पाहिलं की गरागरा सगळीकडे फिरतात आणि थकले की शेताकडे जातात अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

दोन हॅलीपॅड शेतात आहेत असे एकनाथ शिंदे पहिले शेतकरी

मुख्यमंत्र्यांच्या गावात पाऊस पडला की आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात जायला रस्ता उरत नाही. पण स्वतःच्या शेतात दोन दोन हेलीपॅड तयार करणारे गरीब मुख्यमंत्री आणि शेतकरी मी पाहिले आहेत असंही आदित्य ठाकरे म्हणाले. जगातलं पहिलं शेतकरी कुटुंब असेल यांचं (एकनाथ शिंदे) ज्यांच्या शेतात दोन हेलीपॅड आहेत. ५० खोके इतरांना दिलेत आणि हे मुख्यमंत्री झाले आहेत. असे खोकेवाले म्हणजे धोकेवाले यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे आपण महाराष्ट्र म्हणून ठरवणं आवश्यक आहे. २०१९ ला महाविकास आघाडी सरकार आपण स्थापन केलं होतं, त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं चांगलं सरकार बसलं होतं. प्रत्येक जिल्ह्याची प्रगती आपण तेव्हा करत होतो. कोविडचा काळ असूनही उद्योजकांनी आपल्या महाराष्ट्रात गुंतवणूक केली. उद्धव ठाकरे घरोघरी गेले नाहीत. सरकार आपल्या दारीसारखे बोगस कार्यक्रम त्यांनी राबवले नाहीत असाही टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

जनतेच्या मनता राग, आक्रोश

आज मी जेव्हा महाराष्ट्रात फिरतो तेव्हा लोकांच्या मनात आक्रोश आहे, राग आहे. महाराष्ट्र प्रगतीपथावर होता तो यांनी खेचून घेतला आहे. यांनी पाठीत खंजीर खुपसून आपलं सरकार आणलं आणि महाराष्ट्र अंधारात नेला असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. महान्याय, महानिष्ठा, महाराष्ट्र ही आपली ओळख होती. तरीही महाराष्ट्रात उद्योग येत होते. आम्ही महाराष्ट्र म्हणून काय बिघडवलं आहे? की महाराष्ट्रातले उद्योग तुम्ही गुजरातला नेत आहात? असाही प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला.

आज भाजपाकडे २०० आमदार असतील. कारण त्यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. पण मला त्यांना प्रश्न आहे की तुम्हाला महाराष्ट्राचे आमदार म्हणून काही वाटत नाही का? आपलं राज्य मागे जातं आहे याविषयी त्यांना काहीच वाटत नाही का? असेही प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारले आहेत.