वारंवार गुन्हे करूनही कठोर शिक्षा होत नसल्याने कायद्याचा धाक मनातून गेलेली व्यक्ती पुन्हा त्याच वाटेवर कशी जाते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शिर्डीतील नऊ वर्ष वयाच्या मुलीचे अपहरण, अत्याचार व खून प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयित सुनील सुरेश उर्फ पप्पू साळवे (३२) होय. या पूर्वी अशाच प्रकारचे तीन गुन्हे नाशिक जिल्ह्यात साळवेने केले आहेत. त्यापैकी एका गुन्ह्यात त्याला जिल्हा न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयात जन्मठेपेवर आली. ही शिक्षा भोगत असतानाच पॅरोलवर सुटलेल्या साळवेने २८ डिसेंबर रोजी शिर्डी येथील बालिकेचे अपहरण करून अत्याचारानंतर खून करण्याचा चौथा गुन्हा केला. आता तरी साळवेला फाशीची शिक्षा होईल काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
मूळ मराठवाडय़ातील असलेला साळवे हा नाशिकरोड येथील एकलहरे परिसरात बहिणीकडे कामासाठी म्हणून आला. काही दिवसातच तेथे त्याने नऊ वर्षांच्या मुलीचा खून केल्याचे उघड झाल्यानंतर बहिणीने त्याला घराबाहेर काढले. त्यानंतर नाशिकरोड येथील रोकडोबावाडी परिसरात तो आईसह राहू लागला. परंतु अंबड पोलीस ठाण्यातंर्गत त्याने पुन्हा एका मुलीचा अत्याचार करून खून केल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल झाल्यावरही साळवेला त्याची गुन्हेगारी वृत्ती शांत बसू देईना. याच दरम्यान सिन्नर येथे घडलेल्या अशाच एका प्रकरणातही त्याचे नाव पुढे आले.अंबड येथील गुन्ह्य़ात साळवेची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने जन्मठेपेपर्यंत कमी केली. पॅरोलवर सुटून फरारी झाल्यानंतर तो वास्तव्यासाठी शिर्डीत गेला, आणि त्याने चौथा गुन्हा केला. साळवेला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून पोलीस सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतील.