शिवसेनेतील आमदार अपात्रप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर अवघ्या राज्याचं लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयावर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राहुल नार्वेकरांनी हा निकाल ३१ जानेवारी रोजी देणं अपेक्षित होतं. परंतु, राहुल नार्वेकरांच्या वकिलांनी ही वेळ वाढवून मागितली. त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाने आता १५ फेब्रुवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत. १५ फेब्रुवारीसाठी आता अवघे काही दिवस उरलेले असताना या निकालाबाबत अद्यापही काही हालचाल दिसत नाही. त्यामुळे हा निकाल कधी लागणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला राहुल नार्वेकर यांनी अवघ्या दोन शब्दांत उत्तर दिलं आहे.
अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठेचा सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला राज्यातील अनेकांना जाता आलं नाही. सत्ताधारी पक्षातूनही कोणी गेलं नाही. यामुळे ५ फेब्रुवारी रोजी मुंबईतून अयोध्येत आस्था ट्रेन रवाना झाली. मुंबईतील अनेक रामभक्त या ट्रेनने अयोध्येला गेले आहेत. या आस्था ट्रेनला हिरवा कंदील दाखवण्याकरता भाजपाचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही यावेळी उपस्थित होते. राहुल नार्वेकरांशी माध्यमांनी संवाद साधला.
“जनमानसात हीच भावना आहे की प्रभू रामाचं दर्शन व्हावं. ही इच्छा आज पूर्ण होत आहे. प्रभू रामाचं दर्शन प्राप्त होऊन अखंड पृथ्वीवर रामाची कृपादृष्टी राहो”, असं राहुल नार्वेकर म्हणाले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निकालाकरता १५ फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे. त्यामुळे हा निकाल केव्हा लागणार? या प्रश्नावर उत्तर देताना राहुल नार्वेकर यांनी फक्त ‘जय श्रीराम’ असं उत्तर दिलं.
या दोन शब्दांत दिलेल्या उत्तरातून राष्ट्रवादीचा निकाल केव्हा लागणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, राहुल नार्वेकरांना १५ फेब्रुवारीच्या आत निकाल लावावा लागणार आहे. तसंच, सर्वोच्च न्यायालयाने मुतदवाढ दिल्यानंतर राहुल नार्वेकरांनी १५ फेब्रुवारीच्या आत निकाल देऊ असं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे ते आता कधी निकाल लावतात हे पाहावं लागणार आहे.