मतदानाची टक्केवारी वाढल्यास आपल्यालाच त्याचा लाभ होईल, असा दावा काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र, मताची टक्केवारी अधिक झाली म्हणजे लाभ काँग्रेसला होईल की भाजपला, हे दोन्ही दावे आधीच्या आकडेवारीवरून खोटे ठरत असल्याचे दिसून येते.
लातूर लोकसभा मतदारसंघात १६ लाख ८२ हजार ६०७ मतदार आहेत. यात ८ लाख ९७ हजार ९१२ पुरुष व ७ लाख ८४ हजार ६८८ स्त्रियांचा समावेश असून, ७ जण इतर आहेत. लातूर शहर, लातूर ग्रामीण, अहमदपूर, निलंगा, उदगीर व लोहा या विधानसभा क्षेत्रांचा यात समावेश आहे. लातूर व नांदेड जिल्हय़ांतील मतदार आपली मते या निवडणुकीत कोणाच्या पारडय़ात टाकणार आहेत. मागील वेळी ५५ टक्के मतदान झाले होते. काँग्रेसचे जयवंत आवळे केवळ १ टक्का अधिक, म्हणजे ७ हजार १९५ मते घेऊन निवडून आले होते. त्याआधी, २००४ च्या निवडणुकीत ६४ टक्के मतदान झाले. तेव्हा भाजपच्या रूपाताई पाटील निलंगेकर यांनी ४ टक्के अधिक मते घेऊन, म्हणजे ३५ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आल्या. १९९९ मध्ये तब्बल ६९ टक्के मतदान झाले. तेव्हा काँग्रेसच्या शिवराज पाटलांनी ५ टक्के अधिक मते घेऊन विजय संपादन केला. त्यामुळे मतांची टक्केवारी अधिक झाली म्हणजे त्याचा लाभ आपणालाच होईल, हा काँग्रेस अथवा भाजपचा दावा खोटा ठरत असल्याचे दिसून येते.
१९९९ च्या तुलनेत २००४ मध्ये ५ टक्के मतदान कमी होऊनही शिवराज पाटील चाकूरकरांचा पराभव झाला, तर २००९ च्या निवडणुकीत १९९९ च्या तुलनेत तब्बल १४ टक्के मतदान कमी होऊनही काँग्रेसचे जयवंत आवळे निवडून आले. या वेळी मतदानाची टक्केवारी वाढेल, या साठी सर्व स्तरावरून प्रयत्न होत आहेत. त्याचा नेमका लाभ कोणाला, हे सांगणे मात्र गुलदस्त्यात राहणार आहे. लातूर मतदारसंघात १३.३ टक्के मुस्लिम, १९.७ टक्के दलित, तर २.४ टक्के भटके विमुक्त मतदार आहेत. मुस्लिम मतदारांची संख्या २ लाख १६ हजार ८८०, तर दलित मतदार ३ लाख २२ हजार ३५४ आहेत. भटक्या विमुक्तांची संख्या ३८ हजार ३८३ असल्याचा अंदाज आहे.
मागील निवडणुकीत लातूर शहर व ग्रामीण या दोन विधानसभा क्षेत्रांत काँग्रेसला मताधिक्य होते, उर्वरित चारही मतदारसंघांत भाजपला अधिक मतदान झाले. लोहा मतदारसंघात भाजपला सर्वाधिक मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसच्या मंडळींनी या वेळी लोहा मतदारसंघात व्यूहरचना आखली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रताप पाटील चिखलीकर व आमदार शंकरराव धोंडगे या तिघांची तोंडे एका दिशेला राहतील, या साठी प्रयत्न केले गेले. उदगीर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार चंद्रशेखर भोसले, बसवराज पाटील नागराळकर व नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे या तीन ‘दाढय़ां’मुळे काँग्रेसचे पारडे जड होईल, असा काँग्रेसच्या मंडळींचा अंदाज आहे. निलंग्यात माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून, जागृती साखर कारखान्याच्या माध्यमातून आमदार दिलीपराव देशमुखांनी या मतदारसंघात लक्ष घातले आहे. अहमदपूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री विनायक पाटील हे दोन्ही गट कामाला लागल्यामुळे अहमदपुरातूनही या वेळी मताधिक्य मिळेल. लातूर शहर व ग्रामीण हे दोन्ही मतदारसंघ विलासराव देशमुख यांच्या प्रभावाखालील असल्यामुळे या ठिकाणी तर मताधिक्य मिळणारच, याची काँग्रेसजणांना खात्री वाटते. एकूण १ लाखापेक्षा अधिक मताधिक्य काँग्रेसच्या उमेदवारास मिळेल, असा दावा काँग्रेसची मंडळी करीत आहेत.
याउलट भाजपने आपले पारडे अधिक जड असल्याचा दावा प्रचारादरम्यान केला. या निवडणुकीत विलासराव देशमुख नाहीत, ही एक जमेची बाजू. मोदी लाट जशी देशभर, त्यापेक्षा काकणभर अधिक लातूर जिल्हय़ात आहे. देशमुखांच्या घराणेशाहीच्या विरोधातही लोक उभे राहत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अंतर्गत मतभेदांचा लाभ आपल्याला मिळेल. गारपिटीपासून अनेक प्रश्नांवर काँग्रेसने मतदारांना नाराज केले असल्यामुळे त्याचा लाभ मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जातो. गेल्या वेळी ज्या ४ विधानसभा मतदारसंघांत भाजपला मताधिक्य मिळाले, तेथे तर याही वेळी मताधिक्य मिळेलच; शिवाय लातूर शहर विधानसभा मतदारसंघात पिण्याचे पाणी, कचरा, तसेच  एलबीटीचा प्रश्न यामुळे मतदारांत सुप्त नाराजी आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसमधील नव्या इच्छुकांची भाऊगर्दी आहे. ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसला मताधिक्य मिळाले, तर आमदार वैजनाथ िशदे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल. दुसऱ्याला संधी पाहिजे असेल तर या मतदारसंघात काँग्रेसऐवजी भाजपाला मताधिक्य मिळाले पाहिजे, या साठी वैजनाथ िशदे विरोधक काम करीत आहेत. त्यामुळे १ लाखांपेक्षा अधिक मताने भाजपाचा उमेदवार निवडून येईल, असा दावा भाजपाची मंडळी करीत आहेत.