scorecardresearch

“इतक्या तातडीने कारवाई करण्याची गरज काय?” माहीम मजार प्रकरणावरून अबू आझमींचा सरकारला सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर माहीमजवळ समुद्रातील अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात झाली आहे.

Abu Azmi
माहीम मजारवरील कारवाईवरून आमदार अबू आझमी यांनी सरकारला सवाल केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी गुढीपाडवा मेळाव्यादरम्यान माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झालं असल्याचा एक व्हिडीओ दाखवला होता. समुद्रात अनधिकृतपणे दुसरा हाजीअली दर्गा बांधत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. एका महिन्याच्या आत हे बांधकाम हटवलं नाही तर आम्ही तिथे मोठं गणपती मंदिर बांधू असा इशारादेखील राज यांनी यावेळी दिला होता. त्यानंतर याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली असून महापालिकेकडून हे बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे.

या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना विचारले असता आझमी म्हणाले की, “इतक्या त्वरित कारवाई करण्यापेक्षा एकदा त्यांना नोटीस पाठवायला हवी होती. त्यांच्याकडे कागदपत्रं मागवायला हवी होती. ती तपासायला हवी होती. ते बांधकाम अनधिकृत आहे की अधिकृत आहे हे तपासायला पाहिजे होतं. एका मिनिटात तिथे जाऊन कारवाई करणं म्हणजे हे ध्रुवीकरण आहे. हा मुद्दा दुसऱ्या कोणाकडे जाऊ नये यासाठी ही कारवाई इतक्या तातडीने करण्यात आली.”

हे ही वाचा >> संजय राऊतांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवलं, ‘या’ नेत्याचा दिल्लीत आवाज घुमणार

राज ठाकरेंचा आरोप काय?

माहीमजवळ समुद्रात अनधिकृतपणे दुसरा हाजीअली दर्गा बांधत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी कालच्या (२३ मार्च) गुढीपाडवा मेळाव्यात केला होता. या अनधिकृत बांधकामाची एक चित्रफितही त्यांनी भाषणावेळी दाखवली होती. ही मजार अनधिकृत असून ती तोडण्यात यावी, अशी मागणी त्यांनी काल केली होती. तसेच हे बांधकाम तोडलं नाही तर आम्ही तिथे सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं करू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाने काल रात्रीच आदेश काढून हे बांधकाम पाडून टाकण्याबाबत पावले उचलली. सकाळी आठ वाजता पोलीस आणि पालिकेच्या जी उत्तर विभागाच्या पथकाची मदत घेत हे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 17:08 IST

संबंधित बातम्या