सर्वोच्च न्यायालयाने फाशीची सजा कायम ठेवल्याने मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या याकूब मेमनच्या राज्यशास्त्रात पदवीधर होण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीला फाशीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत यश येईल का, याचे उत्तर येणारा काळच देणार आहे. याकूबसह त्याचे दोन साथीदार असगर याकूब मुकादम आणि अब्दुल गनी तुर्क यांना नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
याकूबने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात एम.ए. राज्यशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर परीक्षेच्या अंतिम वर्षांसाठी अर्ज भरला असून नेमकी गुरुवारी त्याच्या अर्जाची नोंद विद्यापीठाने केली. गेल्या वर्षी तो प्रथम परीक्षा उत्तीर्ण झाला होता. या वर्षी त्याच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाले असून राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याचे संकेत मिळाले असले तरी त्याचे राज्यशास्त्रातील शिक्षण पूर्ण होईपर्यंत फाशीची अंमलबजावणी कदाचित टळली जाण्याची शक्यता दृष्टिपथात नाही. १९९३ पासून सुरू असलेल्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा बहुप्रतीक्षित निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. याकूब मेमन आणि त्याच्या साथीदारांना याची माहिती तुरुंगातील कर्मचाऱ्यांकडून मिळाल्यानंतर तो सुन्नच झाला. टाडा न्यायालयाने दिलेली फाशीची सजा जन्मठेपेत बदलेल अशी आशा याकूबला होती. फाशीवर शिक्कामोर्तब झाल्याने हादरलेला याकूब दिवसभर कोणाशीही बोलला नाही.
या संदर्भात तुरुंग अधीक्षक विनोद शेकदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. मात्र, याकूबला राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींना फासावर चढविण्याची व्यवस्था नागपूरच्या कारागृहात तयार आहे. याकूबला कारागृहातील सर्वाधिक सुरक्षित अशा स्वतंत्र फाशी बराकीत ठेवण्यात आले आहे. तुरुंग कर्मचाऱ्यांची २४ तास या बराकीवर नजर असते. नागपूरच्या तुरुंगात आतापर्यंत अनेक कैद्यांना फाशी देण्यात आले आहे. याकूबला फाशी देण्याचा आदेश येताच त्याची येथेच अंमलबजावणी करण्याची तयारी तुरुंग प्रशासनाने केली आहे.

‘गांधीगिरी’चा उपयोग नाही- अ‍ॅड. निकम
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना वरिष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले, गांधीगिरीने संजय दत्तचा बचाव झाला नाही. वाईट संगतीत राहिल्याने त्याच्यावर ही वेळ आली आहे. त्याला मिळालेली शिक्षा ही समाजासाठी धडा ठरेल. आता संजय दत्त कितीही चांगला म्हणविला जात असला तरी केलेल्या गुन्ह्य़ाची शिक्षा त्याला भोगावीच लागेल.