सुधारित आराखडय़ातील बारा कृती गुन्हा ठरणार
कोणाच्याही धार्मिक श्रद्धांवर गदा नाही – मानव
बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित जादूटोणा विरोधी विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आता जवळजवळ धूसर झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत विधेयकाच्या सुधारित आराखडय़ावर चर्चा होऊन मंजुरी मिळेल, असे संकेत सूत्रांकडून मिळाले असले तरी अधिवेशनाचा कालावधी न वाढल्यास एक दिवसात छपाईपासून सर्व प्रक्रिया पूर्ण करून शुक्रवारीच विधेयक विधानसभेत मांडावे लागणार आहे. परंतु, प्रत्यक्षात ही शक्यता कमीच आहे.
वारकरी आणि सनातन्यांचा प्रचंड विरोध असल्याने गाजणारे ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन विधेयक २०११’ मध्ये बऱ्यात सुधारणा सुचविण्यात आल्या असून तसे बदल करण्यास सरकारने अनुकूल भूमिका घेतल्याने या सुधारणा करून सुधारित विधेयक अधिवेशनात मांडले जाण्याची अपेक्षा होती. अधिवेशनाचा पहिला आठवडा सिंचनाच्या मुद्दय़ावरील गोंधळातच गेला. दुसऱ्या आठवडय़ाचे पहिले तीन दिवस आटोपले आहेत. त्यामुळे उर्वरित दोन दिवसात विधेयक आणण्याची घाई सरकार करणार नाही, अशीच चिन्हे आहेत.
दरम्यान अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना जादूटोणा विरोधी विधेयक कोणाच्याही वैयक्तिक धार्मिक श्रद्धांवर घाला घालणारे नसल्याचे स्पष्ट केले. समाजातील नरबळीसारख्या अघोरी प्रथांना आळा घालण्यासाठी विधेयकात तरतुदी आणि बदल करण्यात आले आहेत. न्या. पी.बी. सावंत, शंभरावर आमदार, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या सहमतीने विधेयकाचे प्रारुप तयार करण्यात आले आहे. युती सरकारच्या काळात १६ डिसेंबर १९९५ रोजी नागपूर अधिवेशनातच विधेयक विधानसभेने संमत केले होते. परंतु, त्यानंतर पाच वर्षे संयुक्त समितीकडे पाठविल्याने पडून राहिले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
विधेयकाच्या आराखडय़ातील तरतुदीत बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आहेत. नव्या विधेयकात जादूटोणा आणि अनिष्ट प्रथांबाबत बारा मुद्दे समाविष्ट करण्यात आले असून याबाबत कृती घडून आल्यास तो गुन्हा ठरणार आहे. याबाहेरील एकही गोष्ट यात अंतर्भूत होणार नाही. परंतु, विधेयकाचा अभ्यास न करता याविरुद्ध ओरड करून सदर विधेयक हिंदू धर्माविरुद्ध असल्याची निष्कारण ओरड केली जात आहे, त्यामुळे वस्तुस्थिती जनतेपुढे येणे आवश्यक असल्याचे मानव यांनी सांगितले.
काय आहे विधेयकात?
विधेयकात समाविष्ट असलेल्या बारा कृती गुन्हा ठरणार असून धार्मिक विधी, मंत्रोच्चारण, घरातील धार्मिक कृत्ये यांना यापासून दूर ठेवण्यात आले आहे. सुधारित विधेयकात भूत उतरवण्यासाठी छळ, मारहाण, डागणे हा गुन्हा ठरणार असून प्रार्थना पूजा वा मंत्र टाकणे गुन्हा ठरणार नाही, चमत्कार करून फसवणे, त्यापासून आर्थिक प्राप्ती करणे, जिवाला धोका उत्पन्न होईल व जीवघेण्या जखमा होतील, अशा प्रथा अंमलात आणणे, अमानुष कृत्य करणे, नरबळी देणे, नरबळी देण्याचा सल्ला देणे, अतििद्रय शक्ती असल्याचे भासवून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे, वाईट होईल, अशी धमकी देणे, एखाद्या व्यक्तीला करणी करते, काळी विद्या करते, दूध आटवते, सैतान आहे, असे जाहीर करणे, करणी वा तत्सम सबबीखाली मारहाण, धिंड काढणे, वाळीत टाकणे, मंत्राने भूते पाठविण्याची भीती दाखवणे, वैद्यकीय उपचार रोखून अघोरी उपाय वा अघोरी कृत्य करण्यास भाग पाडणे (वैद्यकीय उपचार न रोखता मंत्र टाकणे मात्र गुन्हा ठरणार नाही), साप, विंचू, कुत्रा चावल्यास वैद्यकीय उपचार रोखून मंत्रतंत्र गंडेदोरे वगैरे उपचार करणे, बोटाने शस्त्रक्रिया करणे वा गर्भाचे लिंग बदलून दाखविण्याचा दावा करणे, विशेष शक्ती असल्याचे वा पूर्वजन्मीचे संबंध असल्याचे सांगून शारीरिक संबंध ठेवणे, विशेष शक्तीद्वारा मूल होण्याचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवणे, मंद बुद्धीच्या व्यक्तीला बाबा बनवून व्यवसाय करणे या बारा बाबींनाच प्रतिबंध करण्यात आला असून जादूटोणास अनिष्ट व अघोरी प्रथा याबाहेरची एकही गोष्ट कायद्यात येत नाही.
काही शब्दातील नवे बदल
अज्ञान व अंधविश्वासावर ऐवजी अज्ञानावर
भोंदू वैद्य व भोंदूबाबा यांनी ऐवजी भोंदू लोकांनी
भोंदूवैद्य व भोंदूबाबाकडून ऐवजी भोंदू लोकांकडून
जादूटोण्यावरील अंधविश्वास ऐवजी ‘जादूटोणा’चा अंतर्भाव
दैवी ऐवजी अतिंद्रिय, मंत्रतंत्र शब्द वगळला
देवदेवस्की शब्द वगळला
कठोर शिक्षा
एखादा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर शिक्षा ६ ते ७ वर्षे कारावास आणि ५ हजार ते ५० हजार रुपये दंड. हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा ठरवला आहे. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने सहाव्या कलमानुसार दक्षता अधिकारी (पोलीस निरीक्षक गट ब दर्जा) नेमला जाणार असून त्याला विशेष प्रशिक्षण दिले जाईल.
संग्रहित लेख, दिनांक 20th Dec 2012 रोजी प्रकाशित
जादूटोणाविरोधी विधेयक मांडण्याची शक्यता धूसर
सुधारित आराखडय़ातील बारा कृती गुन्हा ठरणार कोणाच्याही धार्मिक श्रद्धांवर गदा नाही - मानव बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित जादूटोणा विरोधी विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आता जवळजवळ धूसर झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत विधेयकाच्या सुधारित आराखडय़ावर चर्चा होऊन मंजुरी मिळेल,
First published on: 20-12-2012 at 07:09 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Witchcraft bill may not produced in winter session