दुष्काळामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि दुष्काळाचा फटका वन्य पशु-पक्ष्यांना बसू लागला आहे. जळगावमधील चाळीसगाव तालुक्यातील जामदा परिसरात पुरेसे अन्न व पाणी न मिळाल्याने ११ मोर मृत्युमुखी पडल्याचे गुरुवारी उघड झाले. या वन परिसरात असलेले २००पेक्षा अधिक मोर अन्नपाण्याविना संकटात सापडल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
गुरुवारी सकाळी सरपंच ठाणसिंग पाटील यांच्या शेतात सहा मोर मृत्युमुखी पडल्याचे आढळून आल्यावर त्याची माहिती वन कर्मचाऱ्यांना देण्यात आली. दुपारनंतर कर्मचाऱ्यांनी परिसरात तपास केल्यावर त्यांना अजून काही मोरांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. दोन मोरांना अधिक उपचारार्थ चाळीसगाव येथे नेण्यात आले. पाणी व अन्नाची वानवा हे या मोरांच्या मृत्यूचे कारण असण्याची शक्यता वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.