पाच लाखांचा हुंडा दिला नाही म्हणून नवरा व त्याच्या कुटुंबीयांनी एका डॉक्टरच्या मदतीने पत्नीचा गर्भपात केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी खोलापूर तालुक्यात नवरा, सासू, सासरा, नणंदेसह एका महिला डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खालापूर परिसरात खळबळ उडाली आहे.
  जळगाव जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात राहणाऱ्या अश्विनी सोनवणे हिचा विवाह अमोल बोरसे या जळगावमधील तरुणाशी झाला होता. अमोल हा खालापूर तालुक्यातील कमानी ऑइल कंपनीत कामाला असल्याने लग्नानंतर हे दाम्पत्य महड इथे राहायला आले होते, परंतु अमोल याला कंपनीत काम करण्याची इच्छा नव्हती, त्याला गावाकडे धंदा सुरू  करायचा होता. यासाठी मोठय़ा भांडवलाची गरज होती. यासाठी त्याने अश्विनीकडे पाच लाख रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली होती. सासू-सासऱ्याकडूनही पैशांचा तगदा लावला जात होता, मात्र लग्नासाठी आधीच चार लाख कर्ज काढले असल्याने हा हुंडा देणे अश्विनीच्या वडिलांना शक्य नव्हते. तेव्हापासून बोरसे कुटुंबीयांनी अश्विनीचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली होती. याच काळात अश्विनीला दिवस गेले होते. तपासणीच्या बहाण्याने अमोल व त्याच्या कुटुंबीयांनी तिला डॉक्टर संगीता केजरीवाल यांच्या दवाखान्यात नेले. डॉक्टरांच्या मदतीने एका पेपरवर तिच्या सह्य़ा घेऊन दोन गोळ्या घेण्यास भाग पाडण्यात आले. या गोळ्यांमुळे तिचा गर्भपात झाला. बोरसे कुटुंब एवढय़ावरच थांबले नाही तर त्यांनी पैसे दे नाही तर घर सोडून जा सांगण्यास सुरुवात केली. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्याने अश्विनीने खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी कलम ४९८, ३१२, ३१३ या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पती अमोल बोरसे याला अटक केल्याचे उपनिरीक्षक सुनील अतिग्ने यांनी सांगितले. डॉक्टराविरुद्ध इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, मात्र संगीता केजरीवाल या मुंबईत असल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले आहे.