ताडोबालगतच्या परिसरात बिबटय़ा आणि वाघाकडून होत असलेल्या हल्ल्यांचे प्रकार अजूनही कायम असून गुरुवारी बिबटय़ाने किटाळी-इरई धरण मार्गावर गोपिका काळसर्पे (५०) या महिलेवर हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला. पाचशे गावकऱ्यांनी बिबटय़ाला पाइपमध्ये जेरबंद केले, मात्र वनाधिकारी उशिरा पोहोचल्याने बिबटय़ा पसार झाला. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी वन कर्मचाऱ्याला मारहाण करून जंगलाला आग लावली.
या घटनांची तीव्रता पाहता नरभक्षक बिबटय़ाला गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश मुख्य वनसंरक्षक एस.डब्लू.एच. नकवी यांनी गुरुवारी जारी केले.
 पाणी व सावजाच्या शोधात वणवण भटकत जंगलाच्या बाहेर पडणाऱ्या वाघ आणि बिबटय़ांनी चंद्रपूर जिल्हय़ातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पानजीकच्या गावांमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेल्या २५ दिवसांत वन्यप्राण्यांच्या सात हल्ल्यांमध्ये ८ जणांचा बळी घेतल्याने गावकरी प्रचंड दहशतीत जगत आहेत. सध्या शेतीचा हंगाम संपल्याने जंगलात राहणारे लाखो गावकरी उन्हाळय़ाच्या कामात व्यग्र आहेत. हे गावकरी उन्हाळय़ात मोहफुले गोळा करतात. आता तेंदूपाने गोळा करण्याचा हंगाम सुरू होणार असल्याने अशा घटनांची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत.