गिरणा तसेच मोसम नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे भूमिपूजन आणि नदीजोड कालव्यांच्या सव्‍‌र्हेक्षण कामाचे उद्घाटन ६ एप्रिल रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार असून यानिमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आ. दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तालुक्यात गिरणा नदीवर दाभाडी, पाटणे, सातभाई आणि मोसम नदीवर वडगाव, वडेल, काष्टी व कोठरे येथे सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांना शासनाने मंजुरी दिली असून त्यासाठी सुमारे १७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मोसम नदीचे पूरपाणी बोरी व कान्होळी नदीत आणि अजंग-सातमाने येथील साठवण तलावात टाकण्याच्या कामाच्या सव्‍‌र्हेक्षणास शासनाने मंजुरी दिली असून वडनेर-खाकुर्डी येथे मोसम नदीवरील बंधाऱ्यालाही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ही कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आ. भुसे यांनी नमूद केले.
कमी पर्जन्यामुळे पाटबंधारे खात्याकडे अति तुटीचे खोरे अशी नोंद असलेल्या गिरणा व मोसम खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात पाच दशलक्ष घनफूटपेक्षा अधिक क्षमतेचे बंधारे बांधण्यास शासनाचे र्निबध आहेत. त्यासाठी पाणीच उपलब्ध होत नसल्याच्या कारणावरून ही बंधाऱ्यांची कामे मंजूर होण्यात अनंत अडचणी निर्माण झाल्या होत्या; परंतु सहा-सात वर्षांपासून आपण या बंधाऱ्यांच्या कामांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होतो. या पाणलोट क्षेत्रातील चणकापूर धरणासह अन्य धरणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गाळ साचलेला आहे. त्यामुळे या धरणांसाठी जे पाणी गृहीत धरले जात आहे, तेवढे पाणी प्रत्यक्षात तेथे साठवता येत नाही. ही वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून दिली असता त्याची दखल घेऊन शासनाने १८७ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या बंधाऱ्यांना मंजुरी दिल्याचेही भुसे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान मांजरपाडा-दोन हा गिरणा खोऱ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा प्रकल्प सुरू करण्यासाठी शासनपातळीवरून होत असलेल्या दिरंगाई संदर्भात भुसे यांनी नाराजी व्यक्त केली. विधिमंडळात आश्वासन देऊनही प्रत्यक्षात यासंबंधी शब्द पाळला गेला नसल्याने राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांच्या विरोधात आपण २२ मार्च रोजी हक्कभंग दाखल केला असल्याची माहितीही भुसे यांनी या वेळी दिली.