|| महेश बोकडे

कामगारांचा संप मिटल्यावरही कोळशाची स्थिती गंभीर; वीज खरेदीसाठी महावितरणची खुल्या बाजारात धाव:- कोळसा कामगारांचा संप मिटला, पण महानिर्मितीसह राज्यातील इतरही खासगी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात कोळसा टंचाई कायम आहे. वेकोलिच्या जवळचा खाणीतून कोळसा एक दिवसात मिळेल, परंतु लांबवरून येणाऱ्या कोळसा यायला काही दिवस लागतील. त्यातच दुसरीकडे महानिर्मितीच्या वीज निर्मितीत घट होत असून ती २,७०० मेगावॅटपर्यंत घसरली आहे. तर खासगी प्रकल्पातील निर्मितीचीही हीच स्थिती आहे. मागणी आणि पुरवठय़ाचा ताळमेळ बसवण्यासाठी महावितरणने खुल्या बाजारात धाव घेत गुरुवारसाठी दोन हजार मेगावॅट वीज खरेदी केली. परंतु वीज निर्मिती आणखी घटल्यास राज्य अंधारात जाण्याचा धोका आहे.

वेकोलि, महानदी कोल, साऊ थ इस्टेन कोलफिल्ड लि. सिंगेराणी कोलफिल्ड लि.सह इतरही कंपन्यांतून विविध भागातून कोळसा पुरवठा होतो. जवळच्या खाणीतून मिळणाऱ्या कोळशाच्या तुलनेत लांबच्या खाणीतून जास्त कोळसा येतो. त्यामुळे कोळसा पुरवठा सुरळीत व्हायला काही दिवस लागेल. दुसरीकडे राज्यात २५ सप्टेंबरला विजेची मागणी १८ हजार ४१८ मे.वॅ. होती. पण  महानिर्मितीसह इतर खासगी प्रकल्पातून १० हजार ८४५  मे.वॅ.वीज उपलब्ध झाली. केंद्राच्या वाटय़ातून ७५०० मे.वॅ.वीज मिळाल्याने ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा झाला. कोळसा टंचाईसह इतर कारणांमुळे महानिर्मितीची औष्णिक वीज निर्मितीची क्षमता १० हजार मेगावॅटवरून बुधवारी २,७०० मे.वॅ.पर्यंत खाली आली. अदानीच्या प्रकल्पाची क्षमता तीन हजार मे.वॅ.असताना एक हजार ७०० मे.वॅ. वीज मिळाली. महानिर्मितीच्या जलविद्युत, गॅस, पवनसह इतर प्रकल्पातून मिळालेली वीज, केंद्राकडील राज्याच्या वाटय़ाची ७,५०० मेगावॅट वीज मिळाल्याने बुधवारी महावितरणला अखंडित वीजपुरवठा करता आला.

गुरुवारी महावितरणने खुल्या बाजारातून दोन हजार मेगावॅट वीज ३.३० रुपये प्रती युनीट दराने मिळवली. त्यामुळे एक दिवसाचा प्रश्न मिटला. परंतु पुढे कोळशाअभावी वीजनिर्मिती घटल्यास वीज संकट कायम आहे. बुधवारी सायंकाळी ७ वाजता महानिर्मितीच्या नाशिक औष्णिक प्रकल्पातून २७८ मेगावॅट, कोराडी ५९८ मेगावॅट, खापरखेडा १११ मगावॅट, पारस १४९ मेगावॅट, परळी १८४ मेगावॅट, चंद्रपूर ९४६ मेगावॅट, भुसावळ ३३६ मेगावॅट, उरण गॅस २४२ मेगावॅट, जलविद्युत प्रकल्प एक हजार ६९७ मेगावॅट वीजनिर्मिती होत होती.या वीजटंचाईला महावितरण जबाबदार नसले तरी प्रत्यक्षात त्यांनाच नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

तीन दिवस पुरेल एवढाच कोळसा

बुधवारी नाशिक प्रकल्पात दोन दिवस, कोराडीत तीन दिवस, परळीत पाच दिवस, पारसला तीन दिवस, चंद्रपूर २.५ दिवस, खापरखेडा दोन दिवस, भुसावळ दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक होता. तर महानिर्मितीच्या सगळ्या प्रकल्पांना रोज सुमारे ३२ रॅक कोळशाची गरज असताना केवळ १२ उपलब्ध झाल्या.

राज्यातील ग्राहकांना त्रास होऊ  नये म्हणून महावितरण खुल्या बाजारातूनही वीज खरेदी करीत आहे. गुरुवारसाठीही सुमारे दोन हजार मेगावॅटची सोय झाली आहे. तातडीने वीज निर्मिती वाढायला हवी. जेणेकरून कुणालाही विजेची समस्या उद्भवणार नाही. – पी. एस. पाटील, महावितरण, मुंबई</strong>