जिल्हा परिषदेत वरिष्ठ साहाय्यक पदावर ३० वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला सेवाकाळातील प्रवास देयक, भत्ते आणि किरकोळ रकमांसह वेतनातील सुधारित रक्कम मिळविण्यासाठी १५ महिन्यांपासून खेटे घालावे लागत आहेत.
त्यांची सेवानिवृत्त वेतनाची मूळ नस्तीच हरविल्याचे म्हटले जात असल्याने आता त्या कर्मचाऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांसह त्या त्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
सतीश राजाराम चव्हाण असे या सेवानिवृत्त वरिष्ठ साहाय्यकाचे नाव असून निवृत्ती वेतनाअभावी त्यांची आर्थिक घडी पूर्णपणे बिघडली आहे. उच्च रक्तदाब, हृदयविकार असा त्रास सतीश चव्हाण यांना सुरू झाल्याने त्यांचे कुटुंबीय अस्वस्थ झाले आहे.
आर्थिक अडचणीला सामोरे जाताना चव्हाण यांनी १५ महिन्यापासून त्यांच्या हक्काच्या रकमेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे चव्हाण यांच्या निवृत्ती वेतनाची मूळ नस्तीच गहाळ झाल्याचे सांगण्यात आल्याने आता चव्हाण यांच्या वेतनातील फरक आणि भत्ते ही रक्कम कशी मिळेल, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या त्रासामुळे भविष्यात आपल्या बाबतीत काही अघटित घडल्यास त्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा त्यांनी दिला आहे.