20 October 2019

News Flash

‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’

साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ पर्यटकांसाठी खुली होऊ लागते.

साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ पर्यटकांसाठी खुली होऊ लागते.

असंख्य गुपितं उदरात दडवून उभे असल्यासारखे वाटणारे पर्वत मला नेहमीच भुरळ पाडत आले आहेत. हे पर्वत म्हणजे परमेश्वराचं वसतिस्थान असं मी लहानपणापासून ऐकत आले आहे. अनेक पर्वतांवर सुंदर मंदिरं आहेत. सगळी पवित्र स्थळं पर्वतांवरच कशी काय अशी उत्सुकता मला कायम वाटत आली आहे. हे मी नेहमीच मित्रमंडळींमध्ये बोलून दाखवायची आणि एक दिवस अचानक माझ्या चार मैत्रिणींच्या आणि माझ्या मनात एक विलक्षण कल्पना आली. आपल्या रोजच्या कामांतून सुटी घेऊन काही दिवस पर्वतांमध्ये जाऊन राहण्याचं आयुष्यभर बघितलेलं स्वप्न साकार का करू नये? आम्ही पाचही जणी वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या. पन्ना दोसा यशस्वी फॅशन डिझायनर. तिची बहीण सोहाग आर्थिक सल्लागार. निर्मला दीक्षित इन्शुरन्स एग्झिक्युटिव्ह आणि विवेकानंदांची

अनुयायी. लक्ष्मी लाल एग्झिक्युटिव्ह. मी पत्रकार. आम्ही ठरवलं की सावकाश पोहोचणारा रस्ता घ्यायचा आणि इच्छित स्थळापर्यंतच्या प्रवासाचा मनसोक्त आनंद लुटायचा. आम्ही गाइडही घेतला नाही. मोठं धाडस म्हणजे, मुंबईहून हरिद्वापर्यंत जाण्यासाठी तब्बल अडीच दिवस घेणारी संथ ट्रेन आम्ही निवडली. हरिद्वारहून पुढचा प्रवास केला भाडय़ाच्या एका जुनाट गाडीतून, नशीब ती कुठे बंद पडली नाही. आमचा प्रवास काही निराळाच होता. सरकारी लॉजमध्ये आम्ही उतरलो. अध्यात्मावर, संगीतावर आणि आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टींवर खूप गप्पा मारल्या. आमच्या प्रवासातला सर्वात स्मरणीय भाग होता ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’!..

साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ पर्यटकांसाठी खुली होऊ लागते. आम्ही पाच जणी गेलो होतो ऑगस्टच्या मध्यात. आमचा ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’चा ट्रेक काही वेगळाच होता. कारण, त्याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी हेलिकॉप्टरने व्हॅलीत येणार होत्या असं आम्ही ऐकलं होतं. सुरक्षा कडेकोट होती आणि नेहमी व्हॅली चढण्याचं वाहन म्हणून वापरले जाणारे घोडे त्या दिवशी तिथे सोडले नव्हते. पंतप्रधानांनी भेट देऊन झाल्यावर आम्हाला गुडघाभर बर्फातून चालत जाण्याची परवानगी मिळाली. आमच्या प्रत्येकीसोबत दोन शेर्पा होते. हा रस्ता जात होता सृष्टीच्या एका आश्चर्याकडे – ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’कडे.

आता ही व्हॅली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये गणली जाते. आमच्यापैकी दोघीच, मी आणि निर्मला दीक्षित शेवटपर्यंत पोहोचू शकलो. बाकीच्या खालीच कुठे कुठे थांबल्या. खरं तर हा ट्रेक करून खूप र्वष झाली, पण आजही सूर्यप्रकाशात डोलणारा फुलांचा बहर बघितला की माझं मनही त्या दैवी फुलांच्या स्मृतींनी डोलू लागतं. या फुलांचा माळी कोणी साधासुधा असूच शकत नाही. तो दैवीच असला पाहिजे.

हिमालयाच्या उंच शिखरांमध्ये बद्रिनाथ आणि गोविंदघाटपासून जवळ ही व्हॅली वसली आहे. योगायोग म्हणजे आम्ही हा ट्रेक केला त्याच वर्षी, १९८२ मध्ये, नंदादेवी शिखरावरच्या या ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. या भागातलं बर्फाचं आच्छादन दूर व्हायला लागल्यानंतर म्हणजे जून ते सप्टेंबर या काळातच तिथे जाता येतं. अलीकडच्या काळात जगभरातल्या वनस्पती शास्त्रज्ञांनी, गिर्यारोहकांनी, शास्त्रज्ञांनी या व्हॅलीची माहिती सर्वाना करून दिली असली, तरी या ठिकाणाचा शोध लावला वनस्पतीशास्त्रज्ञ मार्गरेट लेग यांनी. एडिनबर्गच्या रॉयल बोटॅनिकल गार्डनमध्ये त्या काम करत होत्या. १९३९ मध्ये मार्गरेट यांनी या व्हॅलीचा शोध लावला आणि दुर्दैवाने या व्हॅलीतच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ हे ठिकाण आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले. या व्हॅलीत फुललेल्या विविध फुलांचं निरीक्षण करण्यासाठी त्या उतारावर गेल्या असताना घसरून पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. मार्गरेट यांच्या बहिणीने नंतर व्हॅलीला भेट दिली आणि अपघातस्थळाजवळ त्यांचं एक स्मारक उभारलं. आजही पर्यटक या स्मारकाजवळ जाऊन मार्गरेट यांना श्रद्धांजली वाहतात. अर्थात ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ला वनस्पतीशास्त्रज्ञ अठराव्या शतकापासून भेट देत आले आहेत. भारतातल्या धार्मिक ग्रंथांमध्ये तर अनेक शतकांपासून या ठिकाणाचा उल्लेख आहे.

आम्ही गेलो त्या दिवशी व्हॅली चढण्याची परवानगी फार थोडय़ा ट्रेकर्सना दिली जात होती. आमची थोडी निराशा झाली. कारण, या दिव्य स्थळाला भेट देण्याची आमच्यासाठी ती एकमेव संधी होती. निसर्गाचं मंदिरच होतं ते. आम्ही दोघींनी कंबर कसली आणि लवकर उठून पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी व्हॅलीत जाण्यासाठी तयार झालो. बाकीच्या तिघी जणींनी खालीच विश्रांती घ्यायचं ठरवलं. मग आम्ही दोघींनी पहाटे निघून पटकन परत यायचं असा निर्णय झाला. मी आणि निर्मला दीक्षित दोघींनीही मनाची तयारी केली, आधारासाठी काठी घेतली आणि बर्फाच्छादित भागातून मार्ग काढण्यासाठी शेर्पा बरोबर घेतले. आमच्यासाठी हे साहसच होतं. आम्ही काही प्रशिक्षित ट्रेकर्स नव्हतो. पर्वत चढण्याचा तर काहीच अनुभव नव्हता. आम्ही महानगरांमध्ये काम करणाऱ्या बाया होतो, मुलांमध्ये-कुटुंबामध्ये रमलेल्या. तरीही आता इथपर्यंत आलो आहोत, तर ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ पार करायचीच असा निर्धार आम्ही केला. शेर्पा आम्हाला सुरक्षित नेतील अशी मनाची खात्री पटल्यानंतर आम्ही वेग धरला आणि व्हॅलीच्या प्रवेशद्वाराशी जाऊन पोहोचलो. तिथे आणखी काही स्त्रियांचे गट होते. त्यांनी तंबू ठोकले होते. त्या सगळ्या फुलांचं निरीक्षण करण्यात दंग होत्या. त्या व्हॅलीवर एक फिल्म तयार करत होत्या.

‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’मध्ये फुलांचं वैविध्य तोंडात बोट घालायला लावेल असं आहे. केवढे ते रंग आणि केवढे ते आकार. या भागात पऱ्या आणि देवदूत राहतात असं स्थानिक लोक म्हणतात, त्यात काही नवल नाही. आम्हाला ब्रह्मकमळ, ब्ल्यू पॉपी आणि कोब्रा लिली यांसारखी दुर्मीळ फुलं बघता आली हे सुदैवच. फुलझाडांनी डवरलेलं हे सृष्टीतलं एक आश्चर्य होतं. त्यात यातल्या अनेक वनस्पतींना औषधी मूल्यं असल्याने नंदादेवी जैविक अभयारण्याच्या रक्षणासाठी कडक नियम आहेत. या राष्ट्रीय उद्यानातलं सर्वोच्च शिखर म्हणजे गौरी पर्बत. हे शिखर समुद्रसपाटीपासून ६,७१९ मीटर उंचीवर आहे.

आम्ही केदारनाथ-बद्रिनाथ आणि माना गावातही जाऊन आलो. या गावात आम्ही डोंगरातून उसळणारी सरस्वती नदी बघितली. स्वर्गरोहिणी धबधबाही दुरून बघितला. पांडवांनी शेवटच्या प्रवासाला सुरुवात जिथून केली, ती शिखरंही बघितली. केदारनाथमधली एक घटना कायम माझ्या स्मृतीत घर करून राहिली आहे. मला वाटतं हा अनुभव केवळ हिमालयातच येऊ शकतो. आम्ही केदारनाथला गेलो होतो. आमच्या ग्रुपमधल्या पन्नाचे पती काही महिन्यांपूर्वीच वारले होते. तिला त्यांच्या नावाने केदारनाथमधल्या साधूंना अन्नदान करायचे होते. आम्ही बरीच पुरी-भाजी विकत घेतली आणि पन्नाने ती साधूंना दिली. आम्ही घोडय़ावर बसून परत निघालो, तर एका गुहेत एक साधू बसलेले दिसले. आमच्याकडे काहीच उरलेलं नव्हतं. पन्ना म्हणाली की, ‘मी परत जाऊन तुमच्यासाठी जेवण आणते.’ त्यावर ते म्हणाले, ‘नको, माझं जेवण झालं आहे.’ पन्ना म्हणाली, ‘संध्याकाळच्या जेवणात खा.’ तेव्हा ते म्हणाले, ‘मी कधीच भविष्यासाठी काही साठवून ठेवत नाही. उद्या काय होईल कोणाला माहीत? बहनजी, कल का किसने देखा है?’

एवढय़ा एका वाक्यात त्यांनी आम्हाला केवढी मोठी शिकवण दिली! ती सोबत घेऊनच आम्ही परतलो.

भाषांतर – सायली परांजपे

sayalee.paranjape@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on April 8, 2017 1:37 am

Web Title: trip to valley of flowers