आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्यात आपले मनोगत व्यक्त करताना एकीने, ‘सिंगल पेरेंट’ची भूमिका निभावताना तिला किती अडचणींचा डोंगर पार करावा लागला, किती कुत्सित प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली हे सांगितले. ऐकताना चिनी भाषेतील एक म्हण आठवली, ती अशी की एखाद्या रस्त्यावर किती खड्डे आहेत, हे त्यालाच समजते जो त्या रस्त्यावरून जातो.
विभक्त झाल्यावर तीन वर्षांच्या आर्याचा ताबा तिच्या आईने वर्षांने घेतला. आईवडील या दोन्ही भूमिका पार पाडणं म्हणजे तारेवरची कसरत होती. आर्या दोन तासांच्या शाळेत जाई. अर्थार्जनाकरिता वर्षांला दहा तास बाहेर राहावं लागायचं. आर्याचं संगोपन स्वच्छ वातावरणात व्हावं ही तिची रास्त इच्छा! डे केअरमध्ये ती आजारी पडू लागली, ते बंद केल्यावर एका मत्रिणीने हे काम स्वीकारलं, पण तिलाही जमेना! वर्षांची आई व्हीआर एस घेऊन तिच्याकडे आली. पहिलीला प्रवेश घेताना वडिलांचं नाव, आडनाव यावरून वादंग झाले. मुलीला जन्म मी दिलाय, मी सांभाळतेय, तिच्या नावामागे माझंच नाव, आडनाव असावं असं वर्षांचं म्हणणं, तर त्याविरुद्ध शाळेची भूमिका. फक्त मनस्ताप झाला. ‘‘तुझे वडील पी.टी.ए., ओपन हाऊसला का येत नाहीत?’’ या मत्रिणींच्या प्रश्नांनी आर्या रडवेली होई. पुढे मोठं झाल्यावर करियर निवडताना, वसतिगृहात राहताना तिला अडचणी आल्या. वडिलांचा पािठबा नसल्याने शिक्षक, नातेवाईक, सहकारी यांच्या विचित्र प्रश्नांना आर्याकडे उत्तरं नसायची. सगळेच पुरुष वाईट नसतात, थोडी तडजोड करून आयुष्य आनंदाने जाऊ शकते, हे तत्त्वज्ञान म्हणून चांगलं असलं तरी प्रत्यक्ष जगताना आयुष्यातील खाचखळगे कसे रक्तबंबाळ करतात हे तीच जाणते जी ते पार करते. वर्षांने आणि आर्यानेही ते पार पाडले.
आयुष्य व्यवस्थित सुरू न झालेल्या तरुणांनासुद्धा खड्डे लागतातच, फक्त थोडे वेगळे. संतोषला बारावीनंतर दूरच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. कायम आईवडील, भावंडं, आजी यांच्याबरोबर राहिलेल्या संतोषला वसतिगृहात राहणे, मेसवर ठरावीक पदार्थ जेवणे कठीण वाटू लागलं. घराची आठवण बेचन करी, त्यातच रॅिगगसारखे घाणेरडे प्रकार सुरू झाले. त्याचा अभ्यास होईना, कोर्स सोडून परत जाण्याचा विचार मनात घोळू लागला. पण हा पराभव, पळपुटेपणा आहे, अडचणींवर मात करून पदवी मिळवली तरच भविष्य उज्ज्वल आहे, अन्यथा नाही, हे पटलं. होमसिक वाटू नये म्हणून त्याने मित्र जमवले, फुटबॉल टीममध्ये प्रवेश मिळवला. वाचनालय, अभ्यासात जास्त वेळ घालवू लागला. अर्थातच त्याने चांगले गुण मिळवून पदवी घेतली. वाटेवर खड्डे येणारच, ते यशस्वीपणे पार करणं यातच कौशल्य असलं तरी खड्डयांची जाणीव ती वाट चालतानाच होते.

– गीता ग्रामोपाध्ये