‘‘दुसऱ्यांच्या चांगल्या कामाचं, गुणांचं कौतुक करा, त्यांना झालेला आनंद तुम्हाला पण उल्हसित करेल.’’ एका शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच्या फळ्यावर लिहिलेला हा ‘आजचा सुविचार’ चांगल्या कामाचं कौतुक करताना कंजूषपणा करू नका. भरभरून कौतुक करा. आपण केलेल्या चांगल्या कामाच्या पावतीची अपेक्षा आपण इतरांकडून करतो. आपण तशी इतरांना देतो का? विचार केला पाहिजे. छानसं खणाचं परकर-पोलकं किंवा आजच्या फॅशनचा स्कर्ट-टॉप, जीन्स-शर्ट घालून आलेल्या छोटय़ाशा मुलीला सुद्धा वाटतं भेटेल त्याने आपल्याला ‘सुंदर’ म्हणावं. ऐंशी वर्षांच्या आजोबांना ‘तब्येत छान राखली आहे हं आजोबा’ असं म्हटलं तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. मुद्दाम खपून पदार्थ केला आणि कोणी काही बोललं नाही तर गृहिणीचा हिरमोड होतो. नवऱ्याने, मुलांनी फक्त ‘वा, मस्त’, ‘एकदम यमी’ अशी पावती दिली तरी तिच्या अंगावर मूठभर मांस चढतं.
आपण चांगल्या गोष्टींचं श्रेय ते करणाऱ्याला देत नसू, त्याची वाहवा करत नसू तर आपल्याला ते शिकलं पाहिजे. मुद्दाम दुर्लक्ष करत असू तर त्या स्वभावाला मुरड घातली पाहिजे. आपली सुंदर वस्तू, घर, प्रगती, लेखन अशा बऱ्याच गोष्टींची दखल अपेक्षित व्यक्तींकडून घेतली गेली आणि कौतुकाचे चार शब्द ऐकल्यावर किती आनंद होतो, काम करण्याची उमेद, उत्साह कसा वाढतो हे लक्षात येईल.
एका नातेवाईकासाठी नवीन घर बघायला आम्ही बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत गेलो. फ्लॅटच्या एका खोलीत एकजण फरशा घालण्याचं काम करत होता. आमच्याबरोबर आलेले गृहस्थ पटकन त्याला म्हणाले, ‘‘किती छान काम आहे तुमचं! दोन फरशांमधील जोड लक्षातसुद्धा येत नाही.’’ प्रशंसेच्या या चार शब्दांनी तो अगदी भारावून गेला. ‘थॅन्क यू’ म्हणणं त्याला माहीत नसावं, सुचलं नसावं. तो पटकन उभा राहिला, सिमेंट लागलेल्या हातांनी नमस्कार केला. माझ्या कामाचं तुम्ही केलेलं कौतुक मला फार भावलं. हेच सूचित करायचं होतं.
एल.आय.सी.च्या ऑफिसमध्ये काम करणारी एक जण सांगत होती. तिच्याशेजारी बसणारी एक मुलगी तासभर प्रवास करून येते. पण ती दररोज ऑफिस वेळेच्या आधी पाच मिनिटे येते. ती तिला म्हणाली, ‘‘अगं रेखा, लांबून येतेस तरी पाच मिनिटं आधी पोहोचतेस, गाणंसुद्धा शिकलीस गेल्या चार-पाच वर्षांत. तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बाई!’’ रेखा म्हणाली, ‘‘आज मला माझ्या धडपडीचं चीज झाल्यासारखं वाटतंय बघ. आजपर्यंत कोणी माझ्या धावपळीची दखलच घेतली नव्हती.’’ तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. या सर्व संवादाचा फायदा असा झाला, पुढील एक-दोन आठवडय़ात त्या कार्यालयातले सगळे कर्मचारी अगदी वेळेवर हजर होऊ लागले. बॉस चांगल्या कामाची दखल घेऊ लागले. ‘वा! छान.’ असे कौतुकाचे शब्द कर्मचाऱ्यांना ऐकायला मिळू लागले. कोणाच्या वाढदिवसाला, निवृत्तीच्या पार्टीला, पिकनिकला वगैरे रेखाच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवून तिची स्तुती हमखास होऊ लागली. प्रशंसेत किती ताकद आहे, याचा प्रत्यय सर्वानाच आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गीता ग्रामोपाध्ये
geetagramopadhye@yahoo.com

मराठीतील सर्व मन वढाय वढाय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do praise of good work
First published on: 28-05-2016 at 01:26 IST