दुबळ्या आहेत असे पुरुषांनी स्त्रियांना पढवून ठेवले आहे आणि स्त्रियाही असे समजून बसल्या आहेत की, आपण दुबळ्या आहोत आणि पुरुषही असे समजून बसले आहेत की, आपण बलवान आहोत. दोघेही समान आहेत, पण वेगळेही आहेत. पुरुषांजवळ तर्क करण्याची क्षमता निश्चितच स्त्रियांपेक्षा थोडी जास्त आहे. तो थोडा जास्त तर्क करू शकतो. कारण त्याच्याजवळ भावनेची क्षमता थोडीशी कमी आहे. स्त्रियांजवळ भावनेची क्षमता जास्त आहे. त्या जास्त प्रेम करू शकतात, जास्त संवेदनशील असू शकतात, जास्त अनुभूतीपूर्ण असू शकतात. पुरुष जास्त तर्क करू शकतो. जास्त गणित करू शकतो, पण या कारणामुळे कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही होत आणि थोडा दूरवर विचार केला तर प्रेम जेवढे मूल्यवान आहे तेवढे गणित मूल्यवान नाही. गणिताने कदाचित दुकान चालवता येईल; पण आयुष्य नाही चालवता येणार. आणि गणिताने कदाचित विज्ञानाची प्रयोगशाळा चालवता येईल; पण जगण्याच्या प्रयोगशाळेत गणित अगदीच कुचकामी होईल. आपण प्रयोगशाळेशिवाय जगू शकतो; पण हृदयशिवाय नाही जगू शकत.
आपण आजवर जे आकडे शोधले आहेत, ते पुरुषांना मोजण्याचे आकडे आहेत. आपण इंटेलिजन्स कोशंट बनवलेला आहे. आपण माणसाच्या बुद्धीचा आकडा मोजतो. माणसाचा आयक्यू किती आहे; पण त्याचा लव्ह कोशंट किती आहे, त्याची प्रेम करण्याची क्षमता किती आहे, ती मोजण्याचा काही मार्ग आपण शोधलेला नाही. खरे तर पुरुषाला त्याची फिकीर नाही.
हृदय जेवढे मौल्यवान आहे तेवढी बुद्धी मौल्यवान नाही आणि अखेरीस मनुष्य जगतो ते हृदयाने हे स्त्रियांना सिद्ध करावे लागेल. बुद्धीने जास्तीत जास्त कसे जगता येईल याचा उपाय शोधता येईल; पण जगायचे असते
हृदयात. उपजीविका आणि जीवन यात मोठाच फरक आहे. दुकान चालवणे म्हणजे जीवनाचे साधन शोधणे होय. हिशेब करणे म्हणजे जीवनाचे साधन शोधणे होय. घर बांधणे म्हणजे जीवनाचे साधन शोधणे होय. पण ही सगळी साधने आहेत. ही साध्ये नाहीत.
पुरुषाजवळ एक क्षमता आहे- गणिताची, विचाराची, तर्काची. स्त्रीजवळ एक क्षमता आहे- प्रेमाची, हृदयाची, भावनेची. यात श्रेष्ठ कोण हे सांगणे कठीण आहे. पण पुरुष आजवर असेच समजत आला आहे की, तो श्रेष्ठ आहे.
(क्रमश:)
(‘साकेत प्रकाशन’च्या ‘ओशो – स्त्री आणि क्रांती’ पुस्तकातून साभार)