13 August 2020

News Flash

प्रतिक्रिया

आपल्या प्रतिक्रियेने काय नुकसान किंवा फायदा होईल याचा विचार पटकन व्हावा लागतो.

‘‘कोणत्याही प्रसंगावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मग ती कृतीतून, बोलण्यातून कशीही असेल तिचे परिणाम काय होतील याची कल्पना आपल्याला असलीच पाहिजे.’’ आपल्या प्रतिक्रियेने काय नुकसान किंवा फायदा होईल याचा विचार खूप वेळेला अगदी पटकन व्हावा लागतो.

प्रत्येक घरात सकाळी मुलांची शाळेची तयारी, ऑफिसला जाणाऱ्यांची गडबड सुरू असते. अशा वेळी लहान-मोठी धडपड होते. दूध उतू जाणे, पाणी, खाऊ  सांडणे हे होत असते. अशा वेळी शांतपणे तो पसारा ज्याला वेळ असेल त्याने आवरावा. मुलांना ओरडले, एखादा धपाटा घातला तर सगळ्यांचा मूड जातो. दिवसभर तोच विचार सतावत राहतो. कामात लक्ष लागत नाही आणि त्यातून आणखी अडचणी निर्माण होतात. एके दिवशी अवंतीची ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग होती. वेळेवर जाणे अतिशय गरजेचे होते. तिने लवकर उठून रोजची कामे वेळेच्या आधी आटोपली. पतीराजांनापण पटकन येऊन नाश्ता करायला सांगितले. तेवढय़ात सासूबाई आपणही काही मदत करावी या उद्देशाने आल्या आणि टेबलाला अडखळून पडल्या. मुलगा दिलीप अतिशय चिडला. तो आता नेहमीप्रमाणे काही अपमानास्पद बोलणार, सगळ्या दिवसाचे खोबरे करणार, सासूबाई दुखावणार हे विचार सर्रकन् अवंतीच्या मनात आले. तिने त्याला गप्प राहण्याविषयी खाणाखुणा करतच सासूला उठवले. फक्त मुका मार लागलाय याची खात्री केली, आत नेऊन झोपविले, धीर दिला. दिलीप थोडा शांत झाला. परिस्थितीचा आढावा घेत, ‘‘तू जा, मी डॉक्टरांना बोलावतो. मीटिंग संपली की फोन कर, डॉक्टरांनी सांगितलेली औषधे मी तुला सांगतो तेवढी आण,’’ असे सांगितले. ती आल्यावर तो ऑफिसला गेला. सगळे व्यवस्थित झाले. दिलीपची प्रतिक्रिया लाऊड असते, तीच अवंतीने टाळली, म्हणून हे शक्य झाले.

प्रिया पहिल्यांदाच अमेरिकेला जायला निघाली होती. आम्ही तिला निरोप द्यायला गेलो. त्या वेळी पेपर तिकीट असे. मी सहज तिचे तिकीट पाहायला मागितले. २२ मार्चचे तिकीट होते. आज बावीसच तारीख होती, म्हणजे हिची फ्लाइट काल गेली हे माझ्या लक्षात आले. कारण रात्री बारानंतर तारीख बदलते, तिला एकवीस तारखेच्या रात्री जायचे होते. मी हे तिच्या सासू-सासऱ्यांना सांगितले. सासऱ्यांनी कपाळावर हात मारून घेतला. सासूच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. प्रियाच्या माहेरच्यांचा, तिच्या शिक्षणाचा उद्धार झाला. प्रिया रडू लागली, चूक झाली माझी क्षमा करा, असे बोलून हातापाया पडली त्यांच्या. मी म्हटले, आजचे विमान सुटायला अजून खूप वेळ आहे. आपण एअरलाइनला फोन करून आज किंवा उद्या कृपया एक जागा द्या अशी विनंती करू. फोनवर सगळी हकिगत ऐकल्यावर एअरलाइनला घोटाळा कळला. फोनवर बोलणारी व्यक्ती हसली. ‘आम्ही सोय करू’ ही त्यांनी दिलेली प्रतिक्रिया होती, जिने सगळ्यांना हायसे वाटले. आता त्यांनी चोवीस तारखेचे तिकीट ऑफर केले, म्हणजे तेवीसला रात्री तिने निघायचे होते. तिकीट वाया गेले या समजुतीने दिलेली सासूबाईंची कडू प्रतिक्रिया नंतर सगळे विसरले.  एअरलाइनचा माणूस जो आमचा कोणी लागत नव्हता त्याने किती समजूतदारपणाने प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्वाना आनंद दिला, बावीस तारखेच्या रात्री सुखाची झोप दिली.

गीता ग्रामोपाध्ये

geetagramopadhye@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2016 1:02 am

Web Title: reaction 3
Next Stories
1 सुखाचा धागा
2 जे पेराल ते उगवेल
3 भीती घालवा, यश मिळवा
Just Now!
X