23 October 2018

News Flash

सुसंगती सदा घडो..!

संकेतला त्याच्या वडिलांनी माझ्याकडे आणलं ते ‘हा हाताबाहेर चाललाय’ या समस्येसाठी.

हे जीवन विरोधाभासानं भरलेलं आहे. या विरोधाभासाचा अन्वयार्थ लावणं भल्याभल्यांना जमत नाही, तुमची आमची गोष्टच सोडा. माणसं बोलतात तशी वागत नाहीत अन् जगात जे अपेक्षित आहे त्याच्या विपरीत घडताना दिसतं. आयुष्यातल्या या विसंगतीचं दर्शन त्याच वयात घडतं, ज्या वयात त्याच्याशी जुळवून घेणं शक्य नसतं.

संकेतला त्याच्या वडिलांनी माझ्याकडे आणलं ते ‘हा हाताबाहेर चाललाय’ या समस्येसाठी. ‘सांगितलेलं न ऐकणं, रागराग करणं, तुसडेपणे वागणं, बंडखोरी म्हणजे सांगितलं त्याच्या उलट करणं, या स्वरूपाच्या तक्रारी! आता बारा-तेरा वर्षांच्या मुलांमध्ये असं वागणं नवीन नाही, मात्र संकेतने सारे संकेत पायदळी तुडवून बंडखोरीचं अतिरेकी टोक गाठलं आहे, असं आई-वडिलांचं म्हणणं. ‘सांगितलेलं ऐकत नाही हे तर आहेच, पण वेळेवर उठत नाही. आपलं दप्तर, पुस्तकं, वह्य़ा आवरून ठेवत नाही. मळके कपडे बदलत नाही, आंघोळ वेळेवर करत नाही. शाळेला काही कारण नसताना दांडी मारतो. त्याला सगळं हाताशी लागतं. बसल्या जागी टॉवेल आणून द्या, मग आंघोळीला जाणार. टूथपेस्ट लावून ब्रश आणून द्या, मग दात घासणार. पुस्तकं आणून द्या, मग वाचणार. लहान बहिणीशी भांडतो, तिला मार देतो. हल्ली तर खोटंही बोलायला लागला आहे. हे खोटं बोलणंही विचित्र आहे! शाळेत सगळ्यांसमोर मी भाषण दिलं म्हणतो, मला सगळ्या वर्गासमोर शाबासकी दिली म्हणतो, माझी गॅदिरगच्या नाटकात निवड झाली म्हणतो, जेव्हा यातलं काहीच झालेलं नसतं!’ आईनं तक्रारींची जंत्री वाचली. हट्टीपणाच्या तक्रारी कमी अधिक प्रमाणात अनेक मुलांमध्ये असतात तशाच होत्या, मात्र खोटं बोलण्याची तक्रार विशेष होती. संकेत खोटं बोलत नव्हता, दिवास्वप्न रंगवीत होता!

दिवास्वप्ने केव्हा सुरू होतात? माणूस सत्यापासून दूर पळू पाहात असेल तेव्हा. भोवतालची परिस्थिती जाचक, असह्य़ असते, जेव्हा प्रत्यक्षात पळणं शक्य नसतं तेव्हा माणूस आभासी दुनियेत रममाण होतो. तेथे न जमणाऱ्या गोष्टी झालेल्या पाहातो. संकेत कुठल्या सत्यापासून पळू पाहात होता? बहुतांशी मुलं ही कौटुंबिक समस्यांची लक्षणं होऊन समोर येतात. ते पालकांच्या संघर्षांचे बळी असतात. एका अर्थानं, मुलं ही कौटुंबिक स्वास्थ्याचा आरसा. सकृद्दर्शनी संकेतचे आईवडील सुसंस्कृत, सुस्थित अभिजन वर्गातले. मुलांना काही काही कमी न पडू देणारे. मुलांसाठी ‘सगळ्या फॅसिलिटीज’ उपलब्ध करून देणारे; पण संस्कार ‘फॅसिलिटिज’मधून येत नाहीत. मुलं वस्तूंमधनं शिकत नाहीत. त्यांच्यावर वातावरणाचा परिणाम होतो. मुलं पालक काय उपदेश करतात यापेक्षा ते कसे वागतात यावरून शिकतात.

संकेत बारा वर्षांचा. त्याला घरून निघतानाच आईवडिलांनी, ‘आता चल डॉक्टर काकांकडे, ते सांगतील तुला कसं सरळ करायचं ते’ असा दम भरून आणलं होतं! तो आधीच धास्तावलेला. एकदा डॉक्टर हा आईवडिलांच्या पार्टीचा झाला की मुलं तोंड उघडण्याची शक्यता मावळते, हा माझा अनुभव. आता कौटुंबिक वातावरणाची माहिती देणारा निरपेक्ष साक्षीदार जरुरी होता. मला आठ-दहा वर्षांची मुलगी बाहेर खेळताना दिसली. ‘‘ही संकेतची लहान बहीण, हट्ट करून सोबत आली.’’ मी तिला आत घेतलं. एक चॉकलेट देऊन मैत्री केली. गप्पा सुरू झाल्या. ती बडबडी निघाली!

‘‘सकाळी सगळ्यात आधी कोण उठतं?’’,  ‘‘आई!’’ ‘‘रात्री आधी कोण झोपतं?’’ ‘‘मी’’ अशा गोष्टींतून माहिती बाहेर आली. ‘‘बाबा लवकर उठत नाहीत.’’ ‘‘का?’’ ‘‘ते उशिरा येऊन झोपलेले असतात. मग आई रागावते. मग बाबा रागावतात, मग आई ओरडते. मग मी पांघरुणात दडून बसते; पण त्यांच्या ओरडायची भीती वाटते.’’ या कुटुंबातल्या भांडणांचा मुलांवर विपरीत परिणाम होत होता. मुख्य म्हणजे, सकाळी उठणं, स्वत:ची सगळी कामं स्वत: करावी ही शिकवण देणाऱ्या वडिलांना बसल्या जागी ब्रश, टॉवेल, चहा लागत होता. संकेतच्या आळशी वागणुकीची सारी बीजे घरातल्या वातावरणातूनच आली होती. त्यात भांडणाची भर!

कलह सगळ्या कुटुंबांत होतात. ती महिन्या-पंधरा दिवसाला एकदा होतात की तो रोजचाच प्रकार हा वेगळा मुद्दा. काही घरांत सरळ संवादच होत नाहीत. भांडणं हाच संवाद. त्यापेक्षाही वाईट म्हणजे ती मुलांसमोर होतात अन् त्याहीपेक्षा वाईट म्हणजे त्या विसंवादाची अखेर मुद्दा सुटण्यात किंवा समेट घडून येण्यात होत नाही. आनंदात, समाधानात होत नाहीत. खेळीमेळीत होत नाहीत. अशा भांडणानंतरही वातावरण धुमसत राहाणं हे मूळ भांडणापेक्षाही वाईट. कारण त्यात स्फोटाच्या भीतीची शक्यता बाळगूनच मुलांना वावरावं लागतं आणि हे मुलांच्या मानसिक आरोग्याला अतिशय घातक. मोठी माणसं, आपल्याला चांगलं वागण्याचा सल्ला देणारी माणसं चांगली वागताना दिसत नाहीत या विरोधाभासाची उकल मुलं करू शकत नाहीत. हे परस्परविरोधी वागणं मुलांना संभ्रमात टाकतं. त्या संभ्रमावस्थेत ते भीतीने दडपून जातात किंवा आक्रस्ताळे, चिडचिडे होतात, बंडखोर होतात.

तीन ते सात या वयातली मुलं अनुकरणाने शिकतात. तीन वर्षांचा मुलगा कुत्रा कसा भुंकतो, आजोबा कसे खोकतात अशा नकला करू लागतो. त्यातूनच अनुकरणाने शिकण्याची प्रक्रिया सुरू होते. बसल्या जागी ब्रश, टॉवेल मागणे, चहाचा कप तसाच पडून राहू देणे, आळशीपणा, ओरडणे, या सगळ्या गोष्टी संकेत अनुकरणाने शिकला होता. मात्र त्याचा बंडखोरपणा हा आईवडिलांच्या भांडणामुळे त्याच्या मनात निर्माण झालेल्या संघर्षांचे द्योतक होते.

‘‘संकेतचा उपचार तुमच्या उपचाराशिवाय शक्य नाही,’’ मी त्याच्या आई-वडिलांना सांगितलं. ‘‘आमचा कसला उपचार?’’ ही प्रतिक्रिया अपेक्षित होतीच. आपण काही वावगं वागतो हे त्यांच्या ध्यानीही नव्हतं. ‘‘तुम्ही उशिरापर्यंत झोपता, तुम्हाला बसल्या जागी सगळं लागतं, तुम्ही खोटंही बोलता, ताटात अन्न टाकता, घरकामात अजिबात हात घालत नाहीत, वेळप्रसंगी भांडता अन् हे सगळं मुलांसमोर करता, खरंय की नाही ?’’ ‘‘हो म्हणजे.. एखाद वेळेस होत असेल भांडण, पण फार काही नाही..’’ आपल्या वागणुकीचं गांभीर्य अजूनही त्यांना आल्याचं दिसत नव्हतं. ‘आम्ही आमची भांडणं पाहून घेऊ, मुलांनी त्यात लक्ष घालण्याची काय गरज?’ हा युक्तिवाद, ‘हे सगळे तुम्ही अनुकरणशील मुलांसमोर करता’ या अधोरेखित सत्यानं फोलच नव्हे, प्रमाद ठरत होता. ओल्या मातीवर चाललेल्या पायाचे ठसे उमटतात, त्याहीपेक्षा त्या मातीचे अश्मक झाल्यावर ते ठसे आयुष्यभर पुसू देत नाहीत हे भयावह आहे.

‘‘सर, संसारात भांडणं तर होणारच, ती कधीच होत नाहीत असं घर कुठे असेल? अन् बाकी घरातली पोरं काय आईवडील भांडले म्हणून लगेच बिघडतात?’’

संकेतच्या वडिलांचा तर्क शुद्ध होता, पण सर्वसमावेशक नव्हता! ‘संसार म्हटलं की अधूनमधून भांडणं होणार हे खरं आहे. प्रश्न ती मुलांसमोर न होण्याचा आहे. तशी होतच असली, तर मी म्हणेन की, ती मुलांवरील संस्काराचं एक साधन म्हणून वापरा. पालकांचं प्रत्येक भांडण हा मुलांना शिकवून जाणारा एक नाटय़प्रयोग आहे. आपला मुद्दा राग नियंत्रित करून कसा मांडायचा, भांडणातही एकमेकांचा मान, प्रेम कसं राखायचं, कलहाचा शेवट सहमतीत कसा संपवायचा हे मुलांना शिकता येईल असे भान ठेवून भांडा! या वयातील मुलांचा मेंदू तुमची वागणूक नुसती पाहात नाही, त्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतो. त्याच पद्धती आत्मसात करतो. ते भावनिक दृश्ये टिपणारे जिवंत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत! मुख्य म्हणजे तुमच्या वागण्यात आणि उपदेशात सुसंगती ठेवा! ती नसते तेव्हा संभ्रम निर्माण होतो अन् मुलं बंडखोर होतात.’

एका मॉलमध्ये सिक्युरिटी ऑफिसरचे पद सांभाळणाऱ्या वडिलांना सीसीटीव्हीची उपमा पटकन लक्षात आल्याचं दिसलं. त्यांच्यात ‘सुसंगति सदा’ घडत असल्याचं ‘सुजन वाक्य’, लवकरच संकेत शांत झाल्याच्या रूपानं माझ्या कानी पडलं!

डॉ. नंदू मुलमुले

nandu1957@yahoo.co.in

First Published on December 9, 2017 2:47 am

Web Title: dr nandu mulmule article on the relationship between husband and wife