19 November 2017

News Flash

पाऊलवाटा धूसर होतात तेव्हा..

बऱ्याच दिवसांनी कपाटं आवरायला घेतली होती..

राधिका टिपरे | Updated: September 9, 2017 1:05 AM

माझं माझं करत जपलेलं हे घर काही वर्षांनी, मी नसल्यावर कायमचं रिकामं होणार आहे ही कल्पना माझं काळीज कुरतडू लागली. फ्लॅटच्या चार भिंती शिल्लक राहाणार होत्या, पण त्या चौकटीच्या आत सामावलेलं घर मोडणार होतं हे नक्की. पोरं-बाळं, लेकी-सुना यांनी भरलेलं घर माघारी सोडून या जगाचा निरोप घ्यायला मिळणं, ज्यांच्या नशिबी ते भाग्यवंतच म्हणायचे..!

बऱ्याच दिवसांनी कपाटं आवरायला घेतली होती.. कपाटातील सर्व पसारा उचकला आणि आवरायचं सोडून मी त्या पसाऱ्यातच गुंतून गेले. या पसाऱ्यात किती तरी गोष्टी अशा होत्या की त्यांची आता गरज नव्हती. पण त्या टाकून द्यायला जीव होत नव्हता. कपाटाच्या खालच्या कप्प्यातून लेकीसाठी, मिनूसाठी घेतलेल्या बाहुल्या एका बोचक्यात बांधलेल्या मिळाल्या. त्यात अमेरिकेतून तीस वर्षांपूर्वी आणलेली बोलकी बाहुलीही होती. ती बोलायची, दूध प्यायची.. एखाद्या खऱ्याखुऱ्या लहान बाळासारखीच होती दिसायला. पण महागडी म्हणून मेघना कधी खेळलीच नाही या बाहुलीबरोबर. एका लहानशा रबरी बाहुलीबरोबरच खेळायची ती. आता ही तिची अमेरिकन बाहुली राहिलीय इथे आणि माझी बाहुली गेली कायमची अमेरिकेत..

ती बी.डी.एस.च्या शेवटच्या वर्षांला असताना मी तिला एक छानशी बाहुली नेऊन दिली होती तिच्या हॉस्टेलवर. ती बाहुलीसुद्धा इथेच राहिली.. गेल्या वर्षी युक्रेनला गेले असताना मी तिच्यासाठी चिमुकली बाहुलीच घेऊन आले. आता ती अमेरिकेत जाऊन पीएच.डी. झाली आहे तरीही माझ्यासाठी ती बाहुलीच. सामानात सारंगच्या टेनिसच्या रॅकेट्स, त्याच्या पोस्टाच्या तिकिटाचा अल्बम, वेगवेगळ्या देशांतील कॉईन्स आणि करन्सीनं भरलेली त्याची बॉक्स.. हे असं कितीतरी सामान कपाटात ठासून भरलेलं होतं.. ते सगळं बाहेर काढलं खरं पण आवरायचं सोडून मी प्रत्येक लहान-मोठी वस्तू हातात घेऊन निरखत राहिले. हरवत गेले.. इतकी रमत गेले की पसारा आवरणं दूरची गोष्ट, अख्खं घरच विस्कटल्यासारखं झालं. पोरांच्या आठवणीत नकळत रमून गेलं. लहानपणी विविध देशांचे स्टँप आणि नाणी गोळा करणारा माझा सारंगा आता ग्लोब ट्रॉटर झालाय.. सांगली, कोल्हापूरला जावं तसं वेगवेगळ्या देशांत फिरत असतो कामानिमित्त. पण आपल्या भारतापासून आणि माझ्यापासून दूर दूर.. पण त्याच्या आयुष्यातील नव्या नव्या वळणावर..! घर आवरायला काय गेले मनच विस्कटून बसले.

मुलांचं लहानपण आणि त्याच्याशी जडलेल्या आठवणींचा खजिना भवती घेऊन मी वेडय़ासारखी हरवून गेले. खरं तर त्यातील कितीतरी गोष्टींची आता मला गरज नाहीय हे कळत होतं. पण मी टाकून तरी कशा देणार? नाही म्हटलं तरी या आठवणींचीच तर हल्ली सोबत असते. नाही तर मुक्या झालेल्या या घरात दुसरं काय शिल्लक राहिलं आहे? एक तर घरात सध्या इनमीन दोन माणसं.. पण घर मात्र सामानानं खचाखच भरलेलं होतं.. या सामानाचं काय करायचं हा प्रश्न सदैव मनात घर करून असतो.. महागडं, कौतुकाने घेतलेलं सामान टाकता येत नाही आणि सांभाळताही येत नाही. कारण प्रत्येक लहान-मोठय़ा गोष्टींशी काही ना काही आठवणी जोडलेल्या असतात.

पण परदेशात राहणाऱ्या मुलांना या कशाचंच सोयरसुतक राहिलेलं नाही हे आता कळून चुकलं होतं. मध्यंतरी दिलीप चित्रे यांचा एक लेख कुठे तरी वाचनात आला होता. त्यात लिहिल्याप्रमाणे उतार वयात आयुष्यातील गरजा कमी करायला हव्यात असं मनात यायला लागलं. अशातच एक दिवशी मनात विचार आला आणि मी मुलाशी बोलताना त्याला विचारलं, ‘भारतातील तुझं घर म्हणून तुला पुण्यातील फ्लॅट आवडेल की ठाण्यातील?

तुला काय हवे ते सांग. म्हणजे तुझ्या दिदीला काय द्यायचं ते मला ठरवता येईल.’

यावर त्याने दिलेल्या उत्तराने मला अंतर्यामी हलवून टाकले. ‘‘आई, तू आणि बाबा आहात तोपर्यंत आमच्यासाठी भारतातील घर महत्त्वाचं आहे. तुम्ही नसल्यावर मी कशाला घर सांभाळत बसेन? तुला काय वाटतं, दोन-तीन वर्षांनी कधीतरी भारतात आल्यावर आम्ही घराची साफसफाई करत बसणार आहोत का? त्याऐवजी पंधरा दिवस हॉटेलमध्ये राहून परत जाऊ आम्ही..तेच योग्य असेल.’’

त्याच्या या बोलण्यावर मी आश्चर्यचकित होऊन संगणकाच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावरील भाव वाचण्याचा प्रयत्न करू लागले. पण तो निर्वकिारपणे बोलतोय हे लक्षात आलं आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. ‘‘अरे बाळा, हे आपलं घरं, त्यातील सामान, आपले देव..देव्हारा..? सगळं पुसून टाकणार का तू? या सामानाचं काय करायचं..?’’

‘‘आई, अगं सामानाचं काय? तुम्ही नसल्यानंतर ते घर आमच्यासाठी केवळ एक फ्लॅटच असणार आहे.. मी मला हव्या त्या वस्तू घेईन, बाकी सामान काढून टाकीन आणि फ्लॅट भाडय़ानं देऊन टाकीन. तूच सांग, इकडे राहून भारतातील घर सांभाळणं शक्य होणार आहे का? त्यामुळे मला कुठलाही फ्लॅट असला तरी चालेल.’’

खरं तर त्याच्या बोलण्यात काहीच चूक नव्हतं. वरकरणी पाहता त्याचं म्हणणं शंभर टक्के बरोबर होतं, अगदी योग्य होतं. पण मी मात्र अंतर्यामी ढवळून निघाले. माझं माझं करत जपलेलं हे घर काही वर्षांनी, मी नसल्यावर कायमचं रिकामं होणार आहे ही कल्पनाच माझं काळीज कुरतडू लागली. फ्लॅटच्या चार भिंती शिल्लक राहाणार होत्या. पण त्या चौकटीच्या आत सामावलेलं घर मोडणार होतं हे नक्की. ही कल्पनाच मला असह्य़ झाली. खरं तर मरणाच्या गोष्टी करण्याइतकी वाईट परिस्थिती नाहीय. पण एक मात्र नक्की, पोरं-बाळं, लेकी-सुना यांनी भरलेलं घर माघारी सोडून या जगाचा निरोप घ्यायला मिळणं ज्यांच्या नशिबी ते भाग्यवंतच म्हणायचे..! हल्ली बऱ्याच आई-वडिलांच्या नशिबी हे सुख नसतं. भविष्यात काय घडेल कुणास ठाऊक या भावनेनं मन आणखीनच कातर झालं. एकटेपणामुळं धडधाकट असूनही आयुष्याला आलेला जीर्णशीर्ण पोरकेपणा या विचारानंतर अधिकच भेसूर वाटायला लागला. यात मुलांना दोष देण्याचा प्रश्नच येत नव्हता. दोष परिस्थितीचा आहे हे मनाला पटत होतं परंतु वळत नव्हतं. मनाची कितीही समजूत काढली तरी एकटेपणा एखाद्या अजगरासारखा वेटोळं घालायला लागतो मनाभोवती. मग त्यातून बाहरे पडायचा एकच मार्ग दिसतो नजरेला.. घरातून बाहेर पडायचं.. कुठंतरी भटकायला जायचं.

परदेशात राहाणाऱ्या मुलांना भारतात परत यायचंच नसेल तर आपल्या माघारी आपलं घर पुढच्या पिढीने ‘आपलं घर’ म्हणून सांभाळावं असा अट्टहास करणं चुकीचंच होतं. पुढची पिढी किती व्यवहारी आहे हे मुलाच्या बोलण्यावरून कळत होतं. पण या पिढीचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे हे प्रकर्षांनं जाणवत होतं. त्यामुळे स्वत:चा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आलीय हे मला कळून चुकलं. याबाबत मुलीच्या मनातील भावना काय असतील हे जाणून घेण्यासाठी मी मोठय़ा आशेनं मुलीला विचारलं, ‘‘मिनू, आमच्या माघारी पुण्याचं घर तुझ्यासाठी ठेवलं तर चालेलं का तुला? भारतातलं तुझं घर म्हणून सांभाळशील ना?’’ यावर तिचं उत्तरही जवळजवळ तसचं..!

‘‘आई, मला हव्या त्या गोष्टी मी शिप करून घेऊन जाईन.. घर सांभाळणार कोण..? त्यापेक्षा भाडय़ाने दिलेलं चांगलं.’’ माझं उरलंसुरलं अवसान गळून गेलं. ही नव्या पिढीची विचारसरणी होती. यात त्यांचं चूक किंवा बरोबर याचा ऊहापोह करायची गरजच नव्हती. मुलांनी प्रामाणिकपणे उत्तरं दिली होती. याचं जास्त समाधान वाटलं होतं. सध्याच्या पिढीचा ‘डाऊन टू अर्थ’ असलेला जीवनाचा हाय प्रोफाईल फंडा होता हा. कदाचित माझ्या पिढीला न पचणारा, न झेपणारा.. या सर्वामुळं झालं एकच.. माझ्या वेडय़ा मनाला नवीनच घोर लागून राहिला.. काडी काडी, करून जमवलेल्या माझ्या या संसाराचं काय होणार आता..! यामुळे झालंय असं की हल्ली घरातील कुठलीही गोष्ट हातात घेतली की याचं आता काय करायचं, असा प्रश्न मनात उभा राहातो. पण हल्ली मी ठरवलंय. घरातील सामान कमी करायचं.. आतापासून सुरुवात केली तर कदाचित पुढे मुलांना सामानाची विल्हेवाट लावायचा त्रास व्हायचा नाही.

काही दिवसांपूर्वी माझ्या एका मत्रिणीने सांगितलेली घटना ऐकल्यानंतर तर हे विचार मनात घर करूनच बसले. तिच्या परिचयाच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण मुलगा बरेच वर्षांपासून अमेरिकेत राहात होता. तो, त्याची बायको आणि मुले आता भारतात परत येणार नव्हते. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मुलगा भारतात आला. वडिलांचे क्रियाकर्म पार पडेपर्यंत शांतपणे राहिला. पतीच्या निधनाने दु:खी झालेली आई शांत होती. यापुढील आयुष्य एकटय़ानं घालवायची तयारी होती तिची. लहानसे राहाते घर होते. नवऱ्याची पेन्शन मिळणार होती. तिची आपल्या लहानशा घरात एकटीने राहायची तयारी होती. कुणासमोर हात पसरावे लागणार नव्हते. जवळचे, लांबचे नातेवाईक होते, शिवाय वर्षांनुवष्रे जोडलेले शेजारी- पाजारी होते. ‘‘तू एकटी कशाला राहातेस?’’ असं म्हणून मुलाने अट्टहासाने आईची एका वृद्धाश्रमात सोय लावून दिली. आईला मिळणाऱ्या पेन्शनमध्ये तिचा त्या वृद्धाश्रमात राहण्याचा खर्च भागणार होता. पडली, आजारी झाली तरी वृद्धाश्रमातील लोक काळजी घेणार होते. अमेरिकेतून पुन्हा पुन्हा यायला लागणार नव्हतं. शिवाय तिथे अमेरिकेत बसून आईची काळजी करण्याची गरजच उरणार नव्हती. आईला वृद्धाश्रमात भरती करून मुलाने आई-वडिलांचे राहते घर विकून टाकले. मिळालेला पसा बरोबर घेऊन तो अमेरिकेला निघून गेला. आपल्या पोटच्या पोराने आपल्याबरोबर अशा तऱ्हेने धोका केला हे पाहून त्या माऊलीनं हाय खाऊन अंथरूण धरलं ते कायमचंच. अर्थातच ती आई त्यानंतर फार दिवस जगली नाही. आश्रमातून आईच्या मृत्यूची वार्ता मुलाला कळवल्यानंतर; ‘ तिचे क्रियाकर्म तुम्हीच करून टाका. आता तेवढय़ासाठी यायला जमणार नाही’ असं त्याने आश्रमातील ट्रस्टींना कळवलं. त्याने आधीच सर्व गोष्टींची निरवानिरव केलेली होती. पसे खर्च करून परत यायला लागू नये म्हणून घरदार विकून पसा बरोबर घेऊन त्यानं आईकडेही कायमची पाठ फिरवली होती. ऐकायला कसंतरी वाटत असलं तरी पुण्यात घडलेली सत्यकथा आहे ही. अशा मुलांच्या बाबतीत काय बोलावं हाही प्रश्नच आहे. पण व्यवहाराची गणितं अचूकपणे सोडवणाऱ्या नव्या पिढीबद्दल तसंही आपण काही बोलू शकत नाही. कधी कधी वाटतं आपण भारतीय लोक आपल्या मुलांसाठी फार धडपडत राहतो. पण आता खरं तर हे सगळं बदलणारच आहे. कारण नव्या पिढीकडे एकुलते एक मूल असते. त्याला वाढवताना सर्व गोष्टी त्याच्या कलाने घेणाऱ्या आईबापांवर आयुष्यात ही वेळ येणार नाही कशावरून? नव्या पिढीकडे भरपूर पसा आहे, एखादं दुसरं मूल असल्यामुळे त्याच्यासाठी सर्व सुखं हजर करण्यात नव्या आईबापांची धडपड चालू असते. याचा परिणाम काय होईल हे सांगता येणं अवघड आहे. न मागता सर्व सुखं ज्यांच्यासमोर हजर होतात ती पिढी आपल्या जन्मदात्यांविषयी कितपत कृतज्ञ राहतील ही बाबही विचार करण्यासारखीच असेल यात शंकाच नको.

आता एक ठरवलंय.. मुलांना काय वाटतंय याचा विचारच करायचा नाही. आपल्या मनाला योग्य वाटेल ते करायचं. फक्त ते करताना नात्यांमध्ये खोट येणार नाही यासाठी प्रयत्न करायचे. या विचारांनी मनाला उभारी आली आणि नव्या उत्साहाने मी पोरांच्या लहानपणीचं सामान पुन्हा एकदा नीट जपून ठेवण्याच्या उद्देशाने आवरायला घेतलं. ‘यावेळी नातवाला भेटायला जाताना त्याच्या पप्पानं लहानपणी जमवलेलं स्टँप्स आणि नाण्याचं कलेक्शन त्याच्या हातात सोपवण्यासाठी बरोबर घेऊन जाण्याचं मनाशी पक्क केलं आणि आनंदाची एक प्रसन्न लाट मनाला ताजंतवानं करून गेली. पुन्हा एकदा प्रेमानं मीनूच्या सगळ्या बाहुल्या बोचक्यात बांधून नीट ठेवून दिल्या.

राधिका टिपरे

radhikatipre@gmail.com

 

First Published on September 9, 2017 1:05 am

Web Title: kathakathan by radhika tipre