ज्येष्ठात वडील गेले. पुढे आषाढात त्यांना सोबत करणारा बोका बिल गेला. बिल गेल्यानंतर एक दोन-महिने आमच्याकडे मांजर नव्हतं. मग शेजारच्या वाडीतून दोन पिल्लं आणली. दोन्ही बोके निघाले. एकाचं नाव ठिपका.. दुसऱ्याचं कान्हा. लहान होते तोपर्यंत सर्वसामान्य पिल्लांसारखं दोघांचं वर्तन होतं; पण जसजसे मोठे व्हायला लागले तसतसा दोघांच्या स्वभावातला फरक विशेषत्वाने कळायला लागला. ठिपका भयानक आळशी, झोपाळू, ऐतखाऊ.. टिपिकल बोका. सतत कुठल्या तरी सोफ्यावर दिवसचे दिवस लोळत पडणारा.. भूक लागली की मात्र अन्न मिळेपर्यंत जीव जाईस्तो कर्कश ओरडणारा. त्याउलट कान्हा शांत.. अगदी संतसज्जन. बराचसा काळ घरपरिसर, गुरांचा गोठा इकडेच वावरणारा.. मृदू आवाजात ओरडणारा. स्वत:चं अन्न स्वत: कष्ट करून मिळवणारा. त्याच्यातील आणखी एक विशेष गुण म्हणजे त्याला गडीमाणसांसोबत राहायची प्रचंड आवड. गडीमाणसे जिथे कुठे काम करत असतील त्यांच्या पाठीवर असल्यासारखा तो हजर रहायचा, अगदी डय़ुटी बजावत असल्यासारखा. घरापासून साधारण ५०० मीटरच्या परिसरात जिथे कुठे काम असेल तिथेच कान्हा आढळणार हे नक्की. हा गुण थेट भाऊंचा.. आमच्या वडिलांचा. लावणी, कापणी, मळणी, रान तोडणं, कोणतंही काम असो वयाच्या नव्वदीतही वडील तिथे जाऊन भले खुर्चीत बसतील, पण काम संपेपर्यंत बैठक सोडायचे नाहीत. कान्हा अशी माणसांची राखण करताना पाहून गडीमाणसंही म्हणायची, याला भाऊंनीच पाठवलेला आहे. म्हणत असतील, पोरांना झेपणार नाही हा कारभार. हा ठेवील लक्ष. एका प्रसंगी मलाही भास झाला तसा..

मार्च महिना चालू होता. रणरणत्या उन्हातून पावटा तोडायचं काम चालू होतं. कान्हा पूर्णवेळ त्या रणरणत्या उन्हात गडीमाणसांच्या मागून न कंटाळता फिरत होता. एकच्या दरम्यान सुटी झाली. सगळ्यांसोबत तो घरी आला आणि आंब्याच्या कलमाखाली गारव्याला जरा विसावला. पाचेक मिनिटं गेली असतील. कसवाला बांध घालण्याचं कामं करणारे वेगळे गडी आपली विश्रांती संपवून पिकावं, फावडी घेऊन कामावर निघाले. वाडय़ाच्या खोलीचं दार वाजल्याबरोबर कान्हाने डोळे किलकिले करून बघितलं. एक क्षण त्याच्या डोळ्यात कंटाळा दिसला, पण कंटाळा करून कसं चालेल, असं स्वत:लाच बजावत त्याच्या भाषेत काही तरी ओरडत तो त्या गडय़ांबरोबर कामाच्या ठिकाणी रवाना झाला.

Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
udayanraje bhosale yashwantrao chavan marathi news
“यशवंतराव चव्हाणांनी संपूर्ण आयुष्य जनतेला समर्पित केले”, खासदार उदयनराजेंचे गौरवोद्गार

क्षणभर मला वडीलच दिसले त्याच्या जागी. ते असेच शेतातून एखादं काम किंवा शाळा किंवा प्रवास करून घरी यायचे. त्यांच्या आवडत्या आरामखुर्चीवर विसावायचे. एवढय़ात कोणी तरी काही तरी समस्या घेऊन त्यांच्या पुढय़ात उभा राहायचा. ‘‘भाऊ, तुम्ही चलाच,’’ असं विनवायचा. थकवा वगैरे विसरून ते खुंटीवर टांगलेला शर्ट अंगात चढवायचे आणि कोणाची समस्या, भांडण-तंटा सोडवण्यासाठी आलेल्या माणसासोबत जायचे. इंग्रजी छान बोलायचे, कायदेकानूंचं अद्ययावत ज्ञान. त्यामुळे ग्रामपंचायतीपासून ते मंत्रालयापर्यंत कोणाकोणाबरोबर ते बाहेरगावीही आनंदाने जायचे आणि समस्या सोडवूनच परत यायचे.

यथावकाश कान्हा आणि ठिपका दोघेही वयात आले. वयात आलेले दोन नर एका कार्यक्षेत्रात राहू शकत नाहीत. दुसऱ्याला हुसकावण्यासाठी मारामाऱ्या, रक्तपात, प्रसंगी खूनही करतात. त्यामुळे एकाला कोणाला तरी घर सोडायला लागणार होतं हे नक्की, पण तिथेही काही भांडणतंटे न करता एका सुप्रभाती कान्हानं घराचा त्याग केला आणि आपलं कार्यक्षेत्र म्हणून घरापासून सात-आठ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शाळेची निवड केली..

शाळेतही त्यानं आपलं सुपरव्हिजनचं काम चालूच ठेवलं. कधी मी काम करत असलेल्या फाइलवर येऊन बसणं, तर कधी संगणकाच्या की बोर्डवर बसून क्लार्क काय टाइप करतेय ते पाहणं, मुलं पेपर लिहिताना सुपरव्हिजन करणं ही कामं त्यानं स्वत:हून अंगावर घेतली. प्रार्थना हा अतिशय आवडता विषय. प्रार्थना चालू असताना मुलांमधून फिरणं, कधी माझ्या टेबलावर चढून मी गीता सांगत असताना एकटक तोंडाकडे पहात राहाणं. सुरुवातीला मुलांच्यात गोंधळ व्हायचा. मुलं हसायची. मुलंच काय, तो एकटक बघायला लागला की मलाही हसू आवरणं कठीण व्हायचं, पण हळूहळू सरावली सगळी त्याला. रात्रीचाही तो शाळेतच थांबायचा. त्यामुळे एक झालं उंदरांचा कायमचा बंदोबस्त झाला. नाही तर पोषण आहाराचे डाळ-तांदूळ उंदरांपासून वाचवणं म्हणजे मोठंच कठीण काम होतं.

एकदा आकाशदर्शनासाठी रात्रीची शाळा ठेवली होती. पाच वाजता घरी गेलेली मुलं रात्री आठ वाजता परत आलेली बघून तो इतका आनंदित झाला की, काय करावं समजेना त्याला. उडय़ा मारून, ओरडून त्यानं आपला आनंद व्यक्त केला. मैदानावर जाण्यापूर्वी हॉलमध्ये एक फिल्म दाखवली. मुलांच्या रांगा आणि मुलींच्या रांगा यांच्या बरोबर मधे बसून कान्होबांनी पूर्ण फिल्म बघितली.

इकडे संसारी ‘ठिपका’ यांनी रीतसर एक घरोबा करून सूनबाईंना कायमसाठी घरी आणलेलं होतं आणि दर चार-पाच महिन्यांनी वंशविस्ताराचं काम जोमानं सुरू होतं. पहिल्या दोन वेळा ती कुठे व्यायली, पिलांचं पुढे काय झालं, ती जगली की मेली काही कळलं नाही. तिसऱ्या वेळी आम्ही पाळतीवर राहिलो आणि तिचे दिवस भरत आल्यावर एका खोलीत तिला बंदिस्तच करून ठेवली. तिनं दोन पिलांचा जन्म दिला. त्यातलं एक अचानक गेलं आणि एक शिल्लक राहिलं. तीच चिनू..

जुलैच्या दरम्यान गावात बाऊल किंवा तत्सम कोणी तरी मांजरं खाणारा प्राणी आला आणि त्याने ठिपका आणि चिनूची आई यांचा बळी घेतला. चिनू काही दिवस खूप उदास उदास असायची. आईशिवाय कशी राहील असं वाटायचं, पण रुळली हळूहळू.. ठिपका गेल्याचं कान्हाला कसं कळलं कोण जाणे, पण कान्हाचं पुन्हा घरी येणं सुरू झालं. आता शाळा, घर दोन्ही आघाडय़ा तो सांभाळू लागला.

सध्या मांजरांचा मेटिंग सीझन सुरू आहे. कान्हानं कुठे सोयरीक जमवलेली कानावर नव्हतं. मी मधल्या सुटीत किंवा शाळा सुटल्यावर माहेरघरी एक चक्कर मारते. गुरंवासरं, झाडंमाडं सगळ्यांची खबरबात घेते आणि मग स्वगृही येते. दोन दिवसांपूर्वीची गोष्ट. अशीच घरी गेलेली होते. सहज पाहिलं तर वाडय़ाच्या छपरावर कान्हा ताडताड शेपटी आपटत आँउऽऽऽऽ वॉउऽऽऽ असे कसले आवाज काढत बसलेला. मनात म्हटलं, कोणी तरी गाठलेली दिसतेय. मांजराचा ‘रोमान्स’ बघण्यासारखा असतो. सगळी गरज जशी काही बोक्यालाच आहे, असं काहीसं मांजरीचं वागणं असतं. बोका तऱ्हेतऱ्हेने तिचा अनुनय करीत असतो. ती मात्र तिला हे काहीच नको असल्याच्या थाटात एक डोळा त्याच्यावर ठेवून शेपटी आपटत बसलेली असते. बोक्याने जवळ जायचा प्रयत्न करताच ती त्याच्यावर गुरगुरते. त्याला बोचकारते, थोबडवते, लाथा मारते, सतरा जागा बदलते, पण एक क्षण येतोच की दोघांचं जमतं. मग मात्र दोन दोन दिवस खाणंपिणं सोडून मंडळी कुठे तरी निर्जन स्थळी रवाना होतात. परत येतात ती पुन्हा तुझा तू माझी मी अशी.

कान्हाची अशी स्थिती पाहून तो नेमका कोणाचा अनुनय करतो आहे ही उत्सुकता होती. अचानक छपराच्या अगदी वरच्या टोकावरून चिनुबाईंनी कान्हाच्या डोक्यावर टाणकन् अशी उडी मारली की कान्हा बावचळलाच. बेसावधपणे गडगडला तो सरळ छपरावरून खालीच आला आणि अंगणाच्या कडेला बाग आहे तिथे जाऊन बसला. चिनू छपरावरून शांतपणे खाली उतरली. कान्हा कुठेय याचा अंदाज घेतला आणि लपतछपत दबा धरत पुन्हा एकदा त्याच्या डोक्यावर उडी मारली. दचकून कान्हा पुन्हा थोडा लांब गेला.

..पण त्याच्यातला माजावर आलेला नर एकीकडे त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. विव्हळ आवाजात ओरडणं, सगळं शरीर विशेषत: पाश्र्वभाग थरथरवणं, तुताऱ्या सोडणं अशा अनेक प्रकारच्या देहबोलीतून प्रकट होण्याचा तो प्रयत्न करीत होता; पण अजाण चिनूला तो खेळ वाटत होता. तसंही एकटीच वाढल्यामुळे तिची खेळाबागडायची हौस राहिलीच होती. ती हौस ती पुरवून घेत होती.

पण खरी गोष्ट पुढेच आहे, प्राणी आणि माणसातील फरक अधोरेखित करणारी. चिनू अपेक्षित तो प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर कान्हा चूपचाप निघून गेला. त्याने बळजबरी नाही केली. चिनूचं बागडणं आणि कान्हाचं समंजसपणे निघून जाणं पाहाताना वृत्तपत्रात वाचलेल्या, कधी कुठे ऐकलेल्या काही बातम्या आठवून काळजात कळ उठलीच. दोन आणि चार वर्षांच्या मुलींवर जेव्हा बलात्कार होतात त्या वेळी त्या चिमुरडय़ासुद्धा अशाच तो जो कोणी काका, मामा, दादाचं नातं धारण करून त्यांना खाऊ, खेळाचं आमिष दाखवतो, त्याच्यावर अतीव विश्वास टाकून त्याच्यासोबत जात असतील. तो आपले लाड करतोय अशाच समजात असतील. प्रत्यक्षात मात्र तो अधम माणूसपणाला कलंक लावीत आपला कार्यभाग साधतो आणि आपण सहजपणे पशुतुल्य वर्तन असा शिक्का मारून मोकळे होतो; पण एवढंच म्हणावंसं वाटतं की, पशू कधीच माणसासारखे नीचपणे वागत नाहीत..

संध्या साठे-जोशी

sandhyasathejoshi@gmail.com