वसंतराव उठले तेव्हा घडय़ाळाचा काटा आठवर आला होता. रात्री झोपण्यापूर्वीच त्यांनी विचार केला होता. उद्या सुट्टी असली तरी नेहमीप्रमाणे उशिरा उठायचे नाही. सहा वाजताच उठायचं. छान तयारी करायची. गणपतीला लाल फूल वाहायचं, हात जोडायचे. भिंतीवरच्या आईच्या फोटोला हार घालायचा.. आईच्या नुसत्या आठवणीने त्यांचे डोळे पाणावले होते. पत्नीने ‘लाइट घालवू का,’ असे विचारले. तेव्हा तोंडावर चादर ओढून, वसंतराव कूस बदलून नुसतेच ‘हूं’ म्हणाले होते. मग कधी झोप लागली कळलेच नाही.

सकाळी उठल्यावर गायत्री मंत्र म्हणताना त्यांनी पाय जमिनीवर ठेवला, तोच पाय दुखत असल्याचे त्यांना जाणवले. पायजमा वर करत पाहिले, तर काल सॅन्डलच्या पट्टय़ात छोटा खडा अडकून पायाला घासला होता. तेवढय़ा भागावरची त्वचा लालेलाल झाली होती. थोडा भाग सुजल्यासारखा वाटत होता.. वसंतरावांनी पायावर दाब देऊन चालण्याचा प्रयत्न केला.. थोडी कळ सोसली. तरी लंगडय़ासारखेच चालत ते स्वयंपाकघराकडे गेले.

After Virat Kohli Fight why Gautam Gambhir fiercely argue With Umpire
विराट कोहलीचा वाद संपेपर्यंत गौतम गंभीर भडकला; श्रेयसने इशारा करताच पंचांशी भिडला, पण झालं काय? पाहा Video
Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Love Jihad
व्हायरल होत असलेला लव्ह जिहादचा तो व्हिडीओ…
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: सामना चालू असतानाच चाहता मैदानात आला आणि रोहित शर्मा घाबरला; घटनेचा Video सोशल मीडियावर व्हायरल!

गॅसवर ठेवलेल्या पाण्याची वाफ पाहूनच वसंतरावांना उत्साह आला. बायको परातीत कणीक मळत होती. ब्रश, टॉवेल घेऊन वसंतराव बाथरूमकडे गेले. ‘‘अगं प्रतिभा, तेवढं पाणी काढून दे ना..’’ वसंतराव म्हणाले.

‘‘अहो, पाहिलं ना माझे हात पिठाचे आहेत ते.. तरी तुम्ही..’’ प्रतिभा चिडली.

‘‘अगं..’’ वसंतराव बोलता-बोलता थांबले. दुखऱ्या पायाने ते गॅसजवळ गेले. फडके हातात घेतले. गॅस बंद केला. पातेले बाथरूमकडे नेले. बादलीतल्या गार पाण्यात गरम पाणी मिसळले. कपडे काढून वसंतराव स्टूलावर बसले. लालेलाल झालेल्या पायाकडे बघत बसले. आईने लंगडत चालताना पाहिलं असतं तर म्हणाली असती, ‘‘काय रे लंगडतोस.. काय झालं पायाला.. अगं बघ प्रतिभा, याच्या पायाला हळद-बिळद लाव..’’ एखाद्या दिवशी थोडा उशिरा उठलो तर प्रतिभा म्हणायची, ‘‘मज्जाय बुवा लोकांची.. आराम करायला मिळतोय.. आम्हाला पण वाटतं, मस्त उशिरा उठावं.. पण आमच्या नशिबातच नाही.’’ तिच्या या उद्गाराने वसंतरावाची ती सकाळ नासल्यासारखी होई. एकदा असंच वसंतरावांना लवकर जागच आली नाही. शेवटी प्रतिभानेच ओरडून आवाज दिला. उठल्यावर आईने मात्र तिच्या कॉटवरून आवाज दिला, ‘‘का रे, बरं नाही का वाटत. दवाखान्यात तरी जाऊन ये.. काही दुखतंय का?’’ खरंच वसंतरावांची पाठ दुखत होती. रात्री उशिरा पाठ दुखायला लागली. झोपमोड झाली नि मग पहाटे झोप लागली होती.

आता या क्षणी, बाथरूममधल्या स्टूलावर बसताना वसंतरावांना हे सारं आठवतंय. कसं बरे आईला कळलं, आपल्याला बरं नाही ते. त्या वेळेस आपण तिला उडवाउडवीची उत्तरे देऊन शांत बसण्यास सांगितले. आज ती असती तर! ..लालेलाल झालेल्या पायाला ते गरम पाण्याने शेकवू लागले. जखमेच्या वेदनेपेक्षा जीवनातील कोरडेपणा त्यांना जास्त दुखवू लागला..

बाहेरचा दणदणाट ऐकू येऊ  लागला. वसंतरावांना समजले, सोसायटीचा गणपती आला. लाल-पांढरा, झब्बा-पायजमा घालावा म्हणून ते कपाटासमोर गेले. दरवाजा उघडला. इस्त्री करून ठेवलेल्या कपडय़ांच्या ढिगाकडे पाहिले. क्षणभर दरवाजा लावून त्यांनी खुंटीवरचा सदरा-पायजमा अंगात चढवला. हातातले लाल फूल देवापुढे ठेवले. हात जोडले. बाजूच्या फोटोकडे वसंतरावांची नजर गेली. फोटोतल्या आईच्या डोळ्यांतील भाव त्यांना ओळखता येईनात. फोटोतली आई ते मनात शोधू लागले.

गेल्या वर्षी प्रतिभाच्या माहेरी जाण्यासाठी आईला घरात एकटीलाच राहावं लागलं. गणपतीचा सण. आई म्हणत होती, ‘‘अरे! परराज्यात गेलेली माणसे सणासुदीला घरी गावाला येतात. आज नका जाऊ. उद्या, परवा जा. घर रिकामं-रिकामं होईल. मलाही तुमच्याशिवाय करमत नाही.’’

आपलं मात्र रात्रीच ठरलं होतं. आई घर सांभाळील. भाकऱ्या करून ठेवायच्या. प्रतिभाला माहेरी सोडायचं. आपण दोन दिवसांनी यायचं. प्रतिभा इथल्या माणसांच्या येण्या-जाण्यामुळे वैतागायची, चिडचिड व्हायची. सणाचा सगळा आनंदच मावळायचा. आजूबाजूला आनंद असून घरात सुतक असल्यासारखे वाटायचे. मग आपणच हा बेत जुळवून आणला होता आणि इतर दिवशी घरातच असतो ना. मग एवढा काय विचार करायचा? चार दिवसांनी आपण आलो, पण आई मात्र कायमचीच निघून गेली होती..

वसंतरावचे डोळे पाझरू लागले. आईच्या डोळ्यांतील माया ते शोधत राहिले. चहाचा कप घेऊन ते मागच्या पडवीत गेले. झोपाळ्यावर बसून ते घोसाळीच्या पिवळ्या फुलांकडे पाहात राहिले. पावसाने सकाळपासून सुरुवात केली होती. घरोघरी गणपतीच्या पूजेची तयारी चालली होती. पावसामुळे जो-तो आपल्याच घरात कोंडला होता.

‘‘अहो, बसलात काय. शेजारच्यांकडे जाऊन या. दर्शन तरी घेऊन या, उगीच बसण्यापेक्षा.’’ प्रतिभाच्या आवाजाने वसंतरावांची समाधी भंग पावली.

आपल्याला आईची माया कळली नाही, की आपला संसार अजून मुरलाच नाही? या प्रश्नासहित वसंतरावांनी झोपाळ्याला जोराने झोका घेतला. पागोळ्यांचे चार तुषार अंगावर पडले नि वसंतराव म्हणाले, ‘‘मी थांबतो घरात, तूच जाऊन ये.’’

– यशवंत सुरोशे

surosheyashavant@gmail.com