23 January 2018

News Flash

पुनर्भेट

तिचे डोळे डबडबले होते. मला तिच्या मनातली टोचणी जाणवली. थोडा वेळ तिला रडू दिले.

नीलम पालकर | Updated: August 5, 2017 1:01 AM

सगळी लहानपणची मित्रमैत्रिणी बघून सायलीचा चेहरा फुलून गेला;

तिचे डोळे डबडबले होते. मला तिच्या मनातली टोचणी जाणवली. थोडा वेळ तिला रडू दिले. मग थोडय़ा समजावणीच्या स्वरात म्हटले, ‘‘अगं, कौतुक असेल, पण तो बोलून दाखवत नसेल, असतो काही जणांचा स्वभाव! अर्थात ते बरोबर आहे असं नाही, पण तुला माहिती आहे. तू तुझ्या क्षेत्रात यशस्वी आहेस! तू या असल्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर.’’ तिची तात्पुरती समजूत घातली खरी, पण..

एका संध्याकाळी तिचा फोन आला, आवाज कमालीचा संथ, जीव नसलेला! तिने नाव सांगितले नसते तर मी तिला ओळखले नसते. विचारत होती, ‘‘एक मे ला होणाऱ्या गेट टुगेदरला तू येणार आहेस का?’’ मी विचारले, ‘‘सायली, तुझी तब्येत बरी आहे ना, काही प्रॉब्लेम आहे का?’’

‘‘काही नाही गं, भेटल्यावर बोलू.’’ इतके बोलून तिने फोन ठेवून दिला. ‘‘कमालच आहे, हिची!’’ म्हणून मी पण कामाला लागले.

गेट टुगेदरच्या आदल्या दिवशी रात्री परत तिचा फोन आला. ‘‘तू उद्या एकटी असशील तर, मी सकाळीच येते तुझ्याकडे, चालेल का?’’

‘‘अगं, चालेल काय, धावेल!’’ मी उत्साहाने न्हाऊन निघाले. माझी बालमैत्रीण, किती वर्षांनी मला भेटणार होती. लहानपणची जवळजवळ वीस वर्षे आम्ही एकमेकींच्या संगतीत घालावली होती, शाळा-कॉलेजमधले फुलपाखरी दिवस! सगळ्या आठवणींमध्ये तिचा वाटा मोठा होता. ती आली, चेहरा थोडा काळवंडलेला होता. एका नामांकित कंपनीत मोठय़ा पदावर असल्यामुळे कामाचा ताण असणार, असा विचार करून मी तिला बसायला सांगून पाणी वगैरे विचारले. मग कोण कोण येणार वगैरे अशी चर्चा झाली. जेवण आटोपल्यावर मी तिच्या कलाकलाने विचारायचा प्रयत्न केला, ‘‘अगं, माझ्या नोकरीचा, माझ्या पदाचा यांना अजिबात आदर किंवा अभिमान नाही.’’ तिच्या डोळ्यात पाणी तरळले. ‘‘जे मला जमत नाही, त्याबद्दल बोलत राहतात, पण मी जी गोष्ट यशस्वीपणे पार पाडत आहे, त्याबद्दल कौतुक नाही. वाईट वाटतं बघ खूप.’’

तिचे डोळे डबडबले होते. मला तिच्या मनातली टोचणी जाणवली. थोडा वेळ तिला रडू दिले. मग थोडय़ा समजावणीच्या स्वरात म्हटले, ‘‘अगं, कौतुक असेल, पण तो बोलून दाखवत नसेल, असतो काही जणांचा स्वभाव! अर्थात ते बरोबर आहे असं नाही, पण तुला माहिती आहे. तू तुझ्या क्षेत्रात यशस्वी आहेस! तू या असल्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर.’’ तिची तात्पुरती समजूत घातली खरी.

संध्याकाळी आम्ही दादरला पोहोचलो. सगळे आधीच जमले होते. सगळी लहानपणची मित्रमैत्रिणी बघून सायलीचा चेहरा फुलून गेला; सगळे जण गप्पांमध्ये मश्गूल झाले. सगळी पन्नाशी उलटलेली मंडळी लहान मुलांच्या उत्साहाने इकडे-तिकडे फिरत होती. या व्हॉट्सअ‍ॅपला कितीही नावं ठेवा, पण आमच्यासारख्या प्रौढ लोकांना ही देणगीच आहे, त्याच्यामुळेच ही रियुनियन शक्य झाले.

कोणी तरी टुम काढली. एकमेकांची माहिती विचारायची आणि ती स्टेजवर येऊन सगळ्यांना सांगायची. एकमताने ती कल्पना सगळ्यांनी मान्य केली. तोपर्यंत मी सायलीची सगळी माहिती मिळवली होती. मी स्टेजवर गेले, लहानपणच्या तिच्या आठवणी सांगून, तिची आत्ताची प्रगती सांगितली. तिची धडाडी, वरिष्ठ लोकांकडून झालेले कौतुक, कंपनीने दिलेली प्रमाणपत्रे..  टाळ्यांचा नुसता कडकडाट चालू झाला. मैत्रिणींनी पाठीवर शाबासकीची थाप मारली, कोणी येऊन हस्तांदोलन करून गेले, तिचा चेहरा अभिमानाने फुलून आला होता. तिच्या बालमित्रमैत्रिणींनी केलेल्या कौतुकाने ती तृप्त झाली.

हॉलमधून बाहेर पडताना तिने मला घट्ट मिठी मारली आणि पूर्वीच्या उत्साहाने म्हणाली, ‘‘आता मी छोटय़ा छोटय़ा गोष्टींकडे दुर्लक्ष करीन. मी आता मोठी झाली आहे ना!’’ खळखळून हसत तिने माझा निरोप घेतला.

नीलम पालकर chaturang@expressindia.com

First Published on August 5, 2017 1:01 am

Web Title: reunion of old friends in the age of social media
टॅग Reunion
  1. No Comments.