चांगल्या हेतूंनी, पण भिन्न स्थलकाल परिस्थितींनी जगातील सर्व धर्म बनलेले असल्याने, ते मानवनिर्मित आहेत व आजच्या बदललेल्या जगात धर्मग्रंथांना व ईश्वर कल्पनांना चिकटून राहण्याचा काळ आता संपत आलेला आहे. त्यामुळे आता जगाने धर्मनिरपेक्ष आणि निरीश्वरवादीसुद्धा बनावे..

निरीश्वरवादाचा प्रसार हा उघडपणे ईश्वरवादाच्या विरोधात आहे आणि जगातील बहुतेक सर्वच धर्म ईश्वरवादी असल्यामुळे त्या दृष्टीने निरीश्वरवाद हा सर्व धर्माच्यासुद्धा विरोधात आहे. जगातील सर्व धर्मामध्ये एक महत्त्वपूर्ण बाब समान आहे. ती अशी की, स्वर्ग, नरक, ईश्वर, मोक्ष इत्यादी ‘पारलौकिक पदार्थाच्या’ अनुरोधाने ते आपल्या ऐहिक जीवनाला वळण लावू पाहतात आणि त्यातच आपल्या ऐहिक जीवनाची कृतार्थता आहे असे (खोटेखोटेच) मानावे, असे सांगतात. याउलट जे लोक निरीश्वरवादी असतात त्यांना ‘मृत्यूनंतरचे जीवन’ आणि कुठल्याही ‘पारलौकिक पदार्थाचे अस्तित्व’ मान्य नसते. त्यामुळे त्यांना जगातील सर्वच धर्म अमान्य असतात. शिवाय ऐहिक जीवन दु:खमय असून, त्या जीवनापासून सुटका करून घेणे हे आपले सर्वोच्च साध्य आहे असेही सर्व धर्म मानतात, जे विवेकवादाला मान्य नाही. बौद्ध धर्माच्या बाबतीत हे खरे आहे की, त्याच्या मूळ स्वरूपात तो धर्म ईश्वरही मानीत नाही व अमर आत्म्याचे अस्तित्वही मानीत नाही; पण कालांतराने या धर्मातही विशिष्ट प्रकारचा आत्मा, पुनर्जन्म व आदिबुद्ध या नावाने ईश्वरसुद्धा आलेला आहे. याउलट पक्का निरीश्वरवादी माणूस ईश्वर, आत्मा, स्वर्ग, पुनर्जन्म, मोक्ष यापैकी काहीच मानीत नसल्यामुळे, या बाबतीत निरीश्वरवाद सर्वच धर्माच्या विरोधात आहे.
अशा या निरीश्वरवादाचा प्रसार व्हावा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी निरीश्वरवादी मन स्वीकारावे, असे आम्हा विज्ञानवाद्यांना, विवेकवाद्यांना वाटते. ‘ईश्वर आहे’ ही केवळ कल्पना (गृहीत) आहे आणि ‘ईश्वर नाही’ हेच सत्य आहे असे आम्हाला वाटते. हे गणितासारखे सिद्ध करण्याचा दुसरा काही मार्ग नसल्यामुळे ‘ईश्वर अस्तित्वात आहे’ असे सांगणाऱ्या सर्व युक्तिवादांचा पटण्याजोगा प्रतिवाद करून ते खोडता येतात याची आम्ही खात्री करून घेतो/घेतली आहे.
आधुनिक काळात जगभर अस्तित्वात असलेले महत्त्वाचे सर्व धर्म हे इतिहासानुसार गेल्या फक्त पाच हजार वर्षांत, आशिया खंडात निर्माण होऊन मग जगभर पसरलेले आहेत, हे आपण या लेखमालेच्या सुरुवातीच्या लेखांमध्ये पाहिले आहे. सुमारे फक्त दहा हजार वर्षांपूर्वी, याच खंडात, विविध ठिकाणी शेतीचा शोध लागून, रानटी व धावपळीचे जीवन संपून, शेतीचे व अन्न साठवणुकीचे स्थिर जीवन जगणे मानवाला शक्य झाले आणि त्यामुळे त्याला देव, ईश्वर, धर्म इत्यादी कल्पना रचायला स्वास्थ्य मिळाले. गेल्या चार-पाच सहस्रकांत माणसाने हे सर्व धर्म रचले खरे, पण तेव्हा किंवा नंतर लगेच, त्याला विज्ञान या साधनाचा शोध काही लागला नाही. विज्ञान हे हत्यार माणसाला सापडले ते गेल्या अवघ्या ‘चार-पाच शतकांत’. जर कदाचित मानवाला विज्ञान, तंत्रज्ञान आणि विचारांची वैज्ञानिक पद्धत हे शोध ‘आधीच’ म्हणजे पहिले धर्म निर्माण झाले तेव्हाच किंवा त्यापूर्वीच लागले असते व त्यांचा प्रसारही आधीच झाला असता, तर असले हे कल्पिक शक्तींवर आधारित धर्म निर्माण होऊ शकले नसते आणि निर्माण झाले असते तरी एवढे बलिष्ठ व प्रभावशाली झाले नसते.
जग ज्याला धर्म म्हणते, त्याला साधारणत: चार अंगे मानली जातात. ती (१) उपासना (२) तत्त्वज्ञान (३) नीती व (४) जीवन जगण्याचे अनेक नियम ही होत. उपासना म्हणजे त्या त्या धर्माने मानलेल्या ईश्वराची आराधना कशी करावी त्याबाबतचे नियम. तत्त्वज्ञान म्हणजे विश्व, निसर्ग व मानव यांची निर्मिती ईश्वराने कशी केली त्याबाबतचे विचार. तिसरे महत्त्वाचे अंग आहे ‘नैतिकता’. जरी सगळे धर्म ‘चांगले वागा, वाईट वागू नका’ असे सांगत असले तरी वेगवेगळ्या धर्माची नैतिकता समान नसून वेगवेगळी असते, कारण ती प्रत्येक धर्मस्थापनेच्या स्थळ-काल परिस्थिती व तेथील परंपरांनुसार ठरलेली असते व ‘परिस्थिती बदलल्यावर नीती आणि नियम बदलले पाहिजेत’ हे धर्मवाद्यांना पटत नाही. हेच जीवन जगण्याच्या इतर नियमांबाबत होते. जसे लग्न केव्हा करावे, कुणाशी करावे, संसारात स्त्रीचा दर्जा काय असावा, उच्च-नीचता मानावी ती कशी? पित्याच्या संपत्तीची वाटणी इत्यादी. सर्वच धर्म शब्दप्रामाण्यवादी व श्रद्धावादी असल्यामुळे, परिस्थिती बदलली तरी नियम बदलायला ते तयार नसतात. त्याचप्रमाणे धर्माधर्मातील ‘वेगळेपण’ हे त्यांच्यातील ‘साम्यापेक्षा’ जास्त महत्त्वाचे, सारभूत आणि वैशिष्टय़पूर्ण समजले जाते. अशा वेगळेपणाच्या आधारावरच धार्मिकांच्या मनात स्वधर्माविषयी अभिमान निर्माण होतो, रुजतो व त्यातूनच पुढे परधर्माविषयी शत्रुत्व भावना निर्माण होते. सर्व धर्म जरी प्रेम, बंधुभाव वगैरे शिकवितात तरी ते सगळेच परधर्मीयांच्या मात्र जिवावर उठतात, एक दुसऱ्यावर युद्धे आणि अनन्वित अत्याचार लादतात. एकाच धर्माचे दोन पंथसुद्धा एक दुसऱ्यावर अत्याचार करतात. खरेच जगात धर्म व पंथ या कारणाने जेवढा रक्तपात झालेला आहे आणि आजसुद्धा होत आहे, तेवढा इतर कुठल्याही कारणाने झालेला नाही.
आम्हाला असे वाटते की, जगातले सगळे धर्म आणि पंथ हे फक्त शब्दप्रामाण्यवादी व श्रद्धावादी नसून ते वेगवेगळे ‘श्रद्धाव्यूह’ आहेत व म्हणून ते सगळेच मानवी बुद्धीची फसवणूक आहेत. धर्म आणि पंथ या संस्था मानवी मनाला गुलाम करणाऱ्या प्रभावी संस्था आहेत; पण जगाला जी शांतता हवी आहे ती माणसांची शांतता हवी आहे; गुलामांची शांतता नव्हे की स्मशानशांतता नव्हे. त्यामुळे आजचे जगातील प्रचलित धर्म व पंथ ‘जागतिक शांततेचा संदेश’ देऊ शकतील काय, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
आज जगात प्रचलित असलेले सर्व धर्म व पंथ त्यांचे मनुष्यजीवनातील महत्त्व कमी न करता टिकवून ठेवणे किंवा लोकांना अधिकच धार्मिक बनविणे, हे जगाच्या हिताचे आहे, असे काही आम्हाला वाटत नाही. कशाला हवेत हे इतके धर्म आणि पंथ आणि त्यांचे जीवनातील एवढे महत्त्व? मन:शांती आणि मानसिक आधारासाठी म्हणता? आपण काय लहान बाळे आहोत? आपल्या आसपासच्या समाजाने आपला स्वीकार करावा म्हणून म्हणता? मग त्यासाठी चांगले वागले आणि समाजहितकारी कृत्ये केली, की पुरे आहे. धर्म आणि पंथ आपापल्या अनुयायांना प्रेम, बंधुभाव यांची शिकवण देतात म्हणून म्हणता का? पण मग दुसऱ्या धर्माच्या अनुयायांवरसुद्धा प्रेम करा, त्यांनाही बंधुभावाने वागवा, असे सर्व धर्म शिकवतात का? आपले धर्म ‘मानवता’ शिकवतात की ‘संकुचितता’? धर्म जर मानवता शिकवत असतील, तर जगात धर्म-पंथांच्याच नावाने दंगली, कत्तली, दंगे, दहशतवाद चालूच आहेत ते का? कुणी काहीही म्हणो, पण दहशतवाद, अतिरेकी कृत्ये, धार्मिक दंगली हे सर्व स्पष्टपणे धर्मश्रद्धांचेच परिणाम आहेत. तर मग असे हे धर्म, पुढील काळासाठी जागतिक शांततेचा संदेश कसा देऊ शकतील?
आम्हाला सगळे धर्म मुळातच नापसंत असण्याचे मुख्य कारण हे आहे की, धर्म आपली अशी समजूत करून देतात की, श्रद्धा हितकारक असून तोच एक ज्ञानप्राप्तीचा मार्ग आहे, सगळे ज्ञान धर्मग्रंथात आहे, सत्य काय ते धर्मग्रंथातून कळते. याउलट आम्ही असे मानतो की, श्रद्धा हा ज्ञानप्राप्तीचा मार्ग असू शकत नाही. आमच्या मते सत्यशोध हा फक्त प्रत्यक्ष या प्रमाणाने, निरीक्षण परीक्षणाने व वैज्ञानिक पद्धत वापरूनच होऊ शकतो. श्रद्धेमुळे चुकीचे ज्ञान टिकून राहते व नवीन ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे श्रद्धेने आमच्या जीवनात घातलेला ‘धार्मिकता व धर्माभिमान हा धुमाकूळ’ चालूच राहतो, तसेच सामान्य माणसावर दहशत, दंगे व अत्याचार वगैरे चालूच राहतात.
जगातील आजच्या ‘बहुतेक ईश्वर कल्पना’ व ‘बहुतेक धर्मकल्पना’ हातात हात घालूनच जगात आलेल्या आहेत व त्या एक दुसरीच्या आधाराने टिकलेल्या आहेत. त्यामुळे जगात ‘धर्म व त्यांचे महत्त्व’ टिकून राहील, तर ईश्वरावरील श्रद्धेच्या नावाने नवनवे गुरू, पंथ, देव आणि नवनव्या श्रद्धा व अंधश्रद्धा निर्माण होत राहतील आणि जग आहे तसेच (धर्मामध्ये) विभागलेले, हिंसामय व अशांत राहील असे वाटते.
विज्ञान, तंत्रज्ञानाच्या व आधुनिक संपर्क साधनांमुळे वेगाने बदलणाऱ्या जगाच्या आजच्या परिस्थितीत, सर्व जगाच्या हिताचे काय आहे ते आपण पाहिले पाहिजे, कारण सबंध जगच अत्यंत परस्परावलंबी झालेले आहे. न्याय व नीती ही धार्मिक मूल्ये नसून, ती मानवी मूल्ये आहेत हे आपणाला कळले पाहिजे; एवढय़ा वेगवेगळ्या व परस्परविरोधी धर्माची या जगाला यापुढे गरज नाही हे आम्ही मान्य केले पाहिजे. तसेच चांगल्या हेतूंनी, पण भिन्न स्थलकाल परिस्थितीनी जगातील सर्व धर्म बनलेले असल्याने, ते मानवनिर्मित आहेत व आजच्या बदललेल्या जगात धर्मग्रंथांना व ईश्वर कल्पनांना चिकटून राहण्याचा काळ आता संपत आलेला असल्यामुळे आता जगाने धर्मनिरपेक्ष आणि निरीश्वरवादीसुद्धा बनावे, असे आम्हाला वाटते. अशा निरीश्वरवादाच्या आधारावरच ‘मानवधर्म’ (म्हणजे सर्व मानव जातींचा एकच धर्म) निर्माण करता येईल व अशा एखाद्या धर्मानेच यापुढील काळात पृथ्वीवर सर्व मानवजात सुखाने नांदू शकेल, असे आमचे मत आहे. अशा धर्माविषयी पुढील लेखात; पण त्यासाठी प्रत्यक्षात नसलेला कसलाही ईश्वर मानण्याचे काहीही कारण नाही.

delhi high court
नावाने ओळखले जाण्याचा अधिकार ओळखनिश्चितीसाठी महत्त्वाचा!
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो