अभिनेता रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि दिग्दर्शक करण जोहर यांनी सिनेसृष्टीची विनाशर्त माफी मागवी, अशी मागणी आता हिंदी चित्रपट क्षेत्रातील वेगवेगळ्या संघटनांकडून पुढे आली आहे. यूट्यूबवरील चॅनेलसाठी एआयबी नॉकआऊट रोस्ट कार्यक्रमात करण्यात आलेल्या अश्लील शेरेबाजीमुळे याआधीच वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राजकीय पक्षांनीही या कार्यक्रमावर जोरदार टीका करताना एआयबीचे कोणतेही कार्यक्रम यापुढे सादर होऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ‘द फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ या शिखर संघटनेने प्रसिद्धीपत्रक काढून रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि करण जोहर यांना माफी मागण्याची मागणी केली आहे.
सेन्सॉर बोर्डाचे सदस्य अशोक पंडित यांच्या वक्तव्यावरून गदारोळ
हिंदी चित्रपटसृष्टीतील वेगवेगळ्या २२ संघटनांची द फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज ही शिखर संघटना आहे. या संघटनेचे अध्यक्ष कमलेश पांडे आणि सरचिटणीस दिलीप पिथवा यांनी प्रसिद्धपत्रकावर स्वाक्षरी केली आहे.
हा कार्यक्रम म्हणजे व्यासपीठावर पॉर्न शो करण्याचाच प्रकार असल्याचे सेन्सॉर बोर्डाचे सदस्य आणि चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ट्विट केले होते. पंडित यांच्या ट्विटला आपला पाठिंबा असल्याचेही पिथवा यांनी म्हटले आहे. सिनेसृष्टीतील ज्या कलाकारांनी या कार्यक्रमात भाग घेतला, त्यांच्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल गैरसमज निर्माण होतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीकडून एआयबीचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा