११ वर्षांपूर्वी मद्यधुंदावस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सलमान खानवर नव्याने खटला चालविण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान द्यायला हवे. अशा प्रकारे नव्याने खटला चालविण्याचे आणि आतापर्यंत नोंदविण्यात आलेला सर्व पुरावा नव्या खटल्यात ग्राह्य न धरण्याचे आदेश देण्याची तरतूदच कायद्यात नाही, असा स्पष्ट दावा सरकारी वकिलांनी केलेला असूनही  फेरखटल्यास आव्हान न देण्याचा धक्कादायक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. फेरखटल्याला आव्हान न देण्याच्या सरकारचा हा निर्णय म्हणजे सलमानसाठी ‘जय हो’च ठरणार आहे.
फेरखटल्यात आधीच्या खटल्यातील कोणतेही पुरावे आणि साक्षी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. नव्याने सर्व पुरावे न्यायालयात सादर करावे लागतील, असे सत्र न्यायालयाने निर्णय देताना स्पष्ट केले. परंतु या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असणारा सलमानचा अंगरक्षक रवींद्र पाटील तसेच सलमानच्या गाडीखाली जखमी झालेला आणखी एक साक्षीदार अशा दोघांचा मृत्यू झालेला आहे. स्वाभाविकच हे दोघेही साक्ष देऊ शकणार नाहीत. याचा फायदा सलमानला होऊ शकेल. याच मुद्दय़ावर फेरखटला चालविण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान द्यायला हवे, असे स्पष्ट मत सरकारी वकिलांनी दिले. मात्र, त्यांचे मत डावलून या फेरखटल्याच्या निर्णयास आव्हान न देण्याचे सरकारने ठरविले आहे.
येत्या १२ फेब्रुवारीपासून खटल्याचे कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे.