कलाविश्वामध्ये गेल्या वर्षभरापासून अनेक चित्रपटांची निर्मिती होत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हातावर मोजता येतील असे काही चित्रपट सोडले तर प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरत आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘रेस ३’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून पुढील काही दिवसात तो आणखी गल्ला जमवेल असा अंदाज बांधण्यात येत आहे. मात्र येत्या पुढील काळात एकाच वेळी तीन नवे चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर तिन्ही चित्रपटांमध्ये चढाओढ होणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

सध्या अक्षयकुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत असून हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी रीमा कागती यांनी स्वीकारली असून अक्षयबरोबर यात मौनी रॉयदेखील झळकून येणार आहे. अक्षयचे आतापर्यंत सारेच चित्रपट विशेष गाजले आहेत त्यामुळे हा चित्रपट बॉक्सऑफिसवर गाजेल असं सांगण्यात येत आहे. मात्र याबरोबरच जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे जॉनचे चाहते या चित्रपटाला विशेष पसंती देतील असं एकंदरीत दिसून येत आहे. त्यातच जॉन आणि अक्षय हे चांगले मित्र असून या दोघांपैकी कोणाचा चित्रपट सरस ठरेल हे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, १५ ऑगस्टच्याच पार्श्वभूमीवर देओल ब्रदर्सचा ‘यमला पगला दिवाना फिर से’ हा कॉमेडी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या तिन्ही चित्रपटांमध्ये चांगलीच चढाओढ लागणार असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही चित्रपट वेगवेगळ्या धाटणीचे असल्यामुळे त्यांचा चाहता वर्गही वेगवेगळा आहे. याकारणामुळे एकतर या तिन्ही चित्रपटांची चांगली कमाई होईल किंवा त्यापैकी एक चित्रपट सरस ठरेल.मात्र या तिन्ही चित्रपटांचे भविष्य काय असेल ते येणारा काळच ठरवेल असं एकंदरीत दिसून येत आहे.