‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाला वीस वर्षे पूर्ण झाली आहेत आणि दोन दशकांनंतर आजही अभिनेता हृतिक रोशन तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. राकेश रोशन दिग्दर्शित या चित्रपटात हृतिकने दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. हृतिकसोबतच अभिनेत्री अमिषा पटेलनंही या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हृतिकचा पहिलाच चित्रपट ‘ब्लॉकबस्टर हिट’ ठरला होता.

या चित्रपटाविषयी तुम्हाला माहित नसलेल्या सहा गोष्टी-

१- सुरुवातीला अभिनेत्री करीना कपूरला ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातील नायिकेसाठी निश्चित करण्यात आलं होतं. मात्र शूटिंगला सुरुवात होताच करीनाने त्यातून काढता पाय घेतला. इतकंच नव्हे तर चित्रपटातील करीना व हृतिकचे एक दृश्य एडीट करण्यास निर्माते विसरले. नंतर दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द करीनाने हा खुलासा केला. “समुद्रकिनाऱ्यावरील माझं हृतिकसोबतचं एक दृश्य आहे. मी निळ्या रंगाचा स्वेटर आणि जीन्स परिधान केला होता. त्या दृश्यात अमिषा नसून मी आहे”, असं करीनाने सांगितलं होतं.


२- पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हृतिकला तब्बल ३० हजारांहून अधिक लग्नाच्या मागण्या आल्या होत्या. एका मुलाखतीत हृतिकनेच याबद्दल सांगितले होते.
३. सर्वाधिक पुरस्कार जिंकलेला बॉलिवूड चित्रपट म्हणून ‘कहो ना प्यार है’ची ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली होती.
४- अमिषा पटेलची आई आशा पटेल यांनी चित्रपटात हृतिकच्या (राज) आईची भूमिका साकारली होती. चित्रपटात हृतिकने रोहित आणि राज या दुहेरी भूमिका साकारल्या होत्या.
५. चित्रपटात हृतिक (रोहित) अमिषाला (सोनिया) ट्रॅफिक सिग्नलवर पहिल्यांदा भेटतो. याचप्रकारे हृतिकच्या बालपणीचं प्रेम आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान यांचीही पहिली भेट ट्रॅफिक सिग्नलवर झाली होती.
६. हृतिकने साकारलेला राज हा चित्रपटात डावखुरा दाखवण्यात आला आहे. यासाठी हृतिकने प्रत्येक दृश्यात हँड ग्लोव्ह्स वापरत त्याच्या हाताचा सहावा बोट लपवला आहे.