अभिनेता सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून माझं करिअर संपवलं, असे धक्कादायक आरोप दिग्दर्शक अभिनव कश्यपने मंगळवारी केले. फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहित अभिनवने त्याच्या मनातील खदखद बोलून दाखवली. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याने अशीच एक खळबळजनक पोस्ट लिहिली आहे. यावेळी त्याने सलमानच्या ‘बिंग ह्युमन’ या स्वयंसेवी संस्थेवर निशाणा साधला आहे. या संस्थेचा वापर आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी केला जातो असं अभिनवने म्हटलं आहे.

“गुंडगीरी केल्यामुळे सलमानवर अनेक गुन्हेगारी खटले सुरु होते. परिणामी सलमानची प्रतिमा मलिन होत होती. या प्रतिमेतून सलमानला बाहेर काढण्यासाठी वडिल सलीम खान यांनी ‘बिंग ह्युमन’ या स्वयंसेवी संस्थेची निर्मिती केली. आज ही संस्था ५०० रुपयांची जीन्स ५००० रुपयांना विकते. तसंच या संस्थेचा वापर आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी केला जातो.” अशा आशयाची फेसबुक पोस्ट त्याने लिहिली आहे. अभिनवची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अभिनवने यापूर्वी केलेल्या आरोपांवर सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली होती. बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सलीम खान म्हणाले, “हो. आम्हीच सगळं खराब केलंय ना. आधी तुम्ही जाऊन त्यांचे चित्रपट पाहा आणि त्यानंतर आपण बोलू. त्यांनी पोस्टमध्ये माझं नाव लिहिलंय ना. त्यांना कदाचित माझ्या वडिलांचं नाव माहीत नसेल. त्यांचं नाव आहे राशिद खान. त्यांनी आमच्या आजोबा-पणजोबांचंही नाव लिहिलं पाहिजे होतं. त्यांना जे काय करायचं असेल ते करू द्या. त्यावर प्रतिक्रिया देऊन मी माझा वेळ वाया घालवणार नाही.”