साचेबद्ध साहसी चित्रपट आणि साहसी खेळांवर आधारलेले लघुपट, माहितीपट यांच्यात एक मूलभूत फरक कायम असतो. साचेबद्ध साहसी चित्रपटात अनेक वेळा तालमी करत, कधी कॅमेऱ्याच्या ‘ट्रीक’ करत चित्रीकरण केलं जातं. तर साहसी खेळ खेळताना ज्या पद्धतीने धोका थेट अंगावर झेलला जातो तो तसाच्या तसा चित्रीकरणात उतरतो. ना त्यासाठी काही संवाद लिहिलेला असतो, ना ‘टेक- रिटेक’ करायला वाव असतो.
अर्थात असे खेळ कॅमेऱ्यात टिपणे आणि ते पडद्यावर उतरवणे हेदेखील साहसी खेळाइतकंच थरारक असते. जागतिक स्तरावरील अशाच काही दर्जेदार साहसी लघुपटांचा थरारक अनुभव देणारा महोत्सव मुंबईत १५ मार्च रोजी होणार आहे. ‘बांफ माउंटेन फिल्म फेस्टिव्हल’ अशा या महोत्सवात निवडक लघुपटांचा आनंद घेता येणार आहे. तीन मिनिटांपासून ते २६ मिनिटांच्या लांबीपर्यंतच्या १२ लघुपटांचा यात समावेश असणार आहे. स्किईंग, राफ्टींग, पॅराग्लाईडींग, सायकलींग, माउटन बाईकींग, प्रस्तरारोहण अशा अनेक विषयांतील थरार त्यामुळे थेट पडद्यावर पाहता, अनुभवता येणार आहे.  
दरवर्षी कॅनडा येथे नोव्हेंबरमध्ये बांफ माऊंटेनिअरींग फिल्म फेस्टिव्हल या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यात गिर्यारोहणाबरोबरच अनेक साहसी खेळांचादेखील समावेश असतो. महोत्सव आणि स्पर्धा पार पडल्यावर यातील निवडक लघुपट जगाच्या दौऱ्यावर निघतात. दरवर्षी मुंबई येथे हिमालयन क्लब
आणि कॅनडीअन हाय कमिशन यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाचा हा महोत्सव शनिवारी १५ मार्च रोजी ४.३० ते ८.३० यावेळेत प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृह राजा शिवाजी विद्यालय दादर येथे
होणार आहे. या थरारक फिल्म पाहण्यासाठी, साहसाचा पडद्यावर अनुभव घेण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. संपर्क ०२२ – २४९१२८२९.
उत्सवात दाखविण्यात येणारे लघुपट आणि कंसात त्याचे विषय
‘इन टू द माईंड’ (स्किईंग), ‘द क्वेच्शन्स वुई आस्क’ (छोटय़ाशा पॅडलबोर्डवरून पॅसिफिक महासागरातील प्रवास), ‘ऑफ विड्थ आउटलॉ’ (प्रस्तरारोहण), ‘नॉट बॅड’ (सायकलींग, माऊंटन बाईकींग), ‘नॉर्थ ऑफ द सन’ (वॉटर स्किईंग), ‘३५’ ( एका गिर्यारोहकाने ३५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ३५ वेगवेगळ्या वाटांनी केलले गिर्यारोहण), ‘पुअर मॅन्स हेली’  (पॅराग्लाईडींग, स्किईंग), ‘द ब्यूटी ऑफ इररॅशनल’ (धावणे), ‘डाउन द लाइन’  (वेध कनिअनमधील धबधब्याचा), ‘आय एम रेड’ (कोलोरॅडो नदीचा काव्यात्म अनुभव), ‘फ्लो द इलिमेंटस् ऑफ फ्री राइड’ (माऊटन बाइकींग), ‘द सेन्सेइ’ – (प्रस्तरारोहण )