माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यावर चित्रपट
दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधून अभिनय आणि लेखन याद्वारे आपला स्वतंत्र ठसा उमटविणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर आता रुपेरी पडद्यावर एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जीवनावर असलेल्या ‘महानायक-वसंत तू’ या चित्रपटात चिन्मयने वसंतराव नाईक यांची भूमिका साकारली आहे.
‘तू तिथं मी’ या लोकप्रिय मालिकेतील ‘सत्या’ आणि सध्या सुरू असलेल्या ‘तू माझा सांगाती’ या मालिकेतील ‘संत तुकाराम’ यांच्या भूमिकेनंतर चिन्मय राजकारणी आणि मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. एखाद्या कलाकारासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला मिळणे हे नेहमीच आव्हान असते. कलाकारही अशा भूमिकांच्या शोधात असतो. ‘वसंतराव नाईक’ यांची भूमिका साकारण्याची संधी या चित्रपटाच्या निमित्ताने चिन्मयला मिळाली आहे.आदिती फिल्म प्रॉडक्शन हाऊस व बळीराम राठोड यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नीलेश जळमकर यांनी केले आहे. वसंतराव नाईक यांनी दीर्घकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. ‘एका तांडय़ाचा नायक ते महाराष्ट्राचा महानायक’ असा त्यांचा झालेला प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे. चित्रपटात चिन्मय मांडलेकर याच्यासह निशा परुळेकर, रवी पटवर्धन, भारत गणेशपुरे आणि अन्य कलाकार आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी ही चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून दिसणार आहे.
चित्रपटाचे संगीत मंदार खरे यांचे असून यातील गाणी अभिजित कोसंबी, कीर्ती शिलेदार, आदर्श शिंदे, स्वप्नजा लेले यांनी गायली आहेत. चित्रपटाची झलक (ट्रेलर) नुकतीच प्रकाशित करण्यात आली असून चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.