दाक्षिणात्य अभिनेता प्रबेश चक्लाक्कल याचा मृत्यू झाला आहे. तो ४४ वर्षांचा होता. प्रबेश एका युट्यूब चॅनेलसाठी शूटिंग करत होता. त्यावेळी अचानक चक्कर येऊन तो खाली पडला. बेशुद्ध झालेल्या प्रबेशला उपचारासाठी त्वरीत कोच्चीमधील रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार प्रबेश एका जनजागृती करणाऱ्या कार्यक्रमाची निर्मिती करत होता. हा कार्यक्रम केरळमधील वेस्ट मॅनेजमेंट प्रोग्रामवर आधारित होता. या कार्यक्रमाद्वारे तो तरुणांना व्यवस्थापनेचे महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार होता. या कार्यक्रमातील एका भागाचं चित्रीकरण करत असताना तो चक्कर येऊन खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. प्रबेश चक्लाक्कल एक उत्तम अभिनेता आणि नामांकित डबिंग आर्टिस्ट होता. त्याच्या मृत्यूमुळे मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.