अभिनेता रणवीर सिंग महिलांना पुरुषांपेक्षा अधिक श्रेष्ठ मानतो. त्याचा आगामी सिनेमा ‘बेफिक्रे’च्या ट्रेलर प्रदर्शनावेळी रणवीर म्हणाला, ‘महिला या दिलदार असतात. त्या संवेदनशील तर असतातच शिवाय पुरुषांच्या फार पूढे असतात. मी त्यांची प्रगती बघून स्तब्धच आहे. माझ्या आतापर्यंत भारतीय आणि फ्रेंच प्रेयसी राहिल्या आहेत. त्यांच्यासोबत मी चांगला वेळही व्यतीत केला आहे.’ रणवीरने ‘बेफिक्रे’ सिनेमाचा ट्रेलर आयफेल टॉवरवर प्रदर्शित केला होता. पॅरिसमधील आपल्या आठवणी सांगताना ३१ वर्षीय अभिनेता रणवीर म्हणाला की, ‘मी माझ्या प्रेयसीसोबत इथे सुट्ट्यांचा आनंदही घेतला आहे.’

‘माझी एक प्रेयसी पॅरिसमधली होती. ती मोरक्कोतली सगळ्यात सुंदर मुलगी होती. मी इथे ज्यांना ज्यांना भेटलो आहे, त्यांच्या सर्वांसोबतच्याच चांगल्या आठवणी माझ्या मनात कायम आहेत.’ आदित्य चोप्राने दिग्दर्शित केलेला बेफिक्रे हा सिनेमा अधिकतर फ्रांसच्या शहरांमध्येच चित्रित करण्यात आला आहे. याशिवाय कान्स चित्रपट महोत्सवाचा हिस्सा बनण्यासाठी त्याला परत या देशात यायचे आहे.

बऱ्याच काळापासून अभिनेता रणवीर सिंग कोणत्याही सिनेमातून झळकला नव्हता. बॉलीवूडचा बाजीराव नक्की गेला तरी कुठे? असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर ते स्वाभाविकच आहे. पण, काळजी वाटण्याचं कारण नाही, कारण रणवीर सिंग पुन्हा एकदा त्याच्या धम्माल अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बेफिक्रे’ या त्याच्या आगामी सिनेमात तो दिसणार आहे. गेला काही काळ या सिनेमाच्या पोस्टर आणि गाण्यांचीच रसिकांमध्ये चर्चा होती. त्यामुळे या चित्रपटाबाबत सिनेवर्तुळातही अनेक चर्चांना उधाण आले होते. अवघ्या दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये या चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज लावता येत आहे. त्यातही मुख्य भूमिकांमध्ये दिसणारे वाणी कपूर आणि रणवीर सिंग अनेकांचीच मने जिंकत आहेत हे नक्की.