नाटक, दूरचित्रवाणी आणि चित्रपट अशा माध्यमात मुशाफिरी करणारा अभिनेता संदीप पाठक हा ‘इडक’ चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत झळकला आहे आणि योगायोग असा की ऑगस्ट महिन्यात त्याच्या अभिनय कारकीर्दीला वीस वर्षे पूर्ण होत आहेत. ‘कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त दाखवण्यात आलेल्या ‘इडक’ला २०१९ चा महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट ग्रामीण समस्याप्रधान चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. हा चित्रपट दीपक गावडेंनी दिग्दर्शित केला असून २१ ऑगस्टला ‘झी ५’ वर प्रदर्शित होत आहे.

या वीस वर्षांच्या कालावधीत संदीपने ‘श्वास’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘रंगा पतंगा’, ‘पोस्टर गर्ल’ या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. ‘फू बाई फू’, ‘असंभव’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘घडलंय बिघडलंय’ या मालिका तसेच ‘लग्नकल्लोळ’, ‘सासू माझी धांसू’, ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकांद्वारे तो वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आला. ‘पुण्याच्या ललित कला केंद्रा’तून शिक्षण घेतलेला हा गुणी कलाकार ‘इडक’ चित्रपटाद्वारे प्रथमच नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाविषयी संदीपने सांगितले की, ‘इडक ही गोष्ट एका तरुणाची असून तो बकरीला घेऊन प्रवासाला निघतो. बक ऱ्याला बळी दिल्यास स्वप्न पूर्ण होते अशी आपल्याकडे भाबडी समजूत आहे. यातील नाम्या नावाच्या तरुणाचे लग्न जमत नसल्याने गावकरी त्याला बक ऱ्याचा बळी देण्यास सांगतात. नाम्याकडे बकरा खरेदी करण्यासही पैसे नसतात. एवढी त्याची परिस्थिती हलाखीची आहे. त्याचा बकरा मिळवण्यापर्यंतचा संघर्ष या चित्रपटात रंजकतेने मांडला आहे. नंतर गावातील जत्रेत बक ऱ्याचा बळी देण्यासाठी जाताना त्याची या मुक्या जनावराशी मैत्री होते. समाजातील अंधश्रद्धेवर हा चित्रपट भाष्य करतो,’ असे त्याने स्पष्ट केले.

नाम्याची भूमिका साकारताना माझी ग्रामीण पार्श्वभूमी कामी आली. मी बीड जिल्ह्य़ातील माजलगावचा. या भूमिकेसाठी गावरान भाषेचा लहेजा, ग्रामीण बाज या गोष्टींसाठी विशेष मेहनत घ्यावी लागली नसल्याचे संदीपने सांगितले. वीस वर्षांनतर चित्रपटात नायकाची भूमिका मिळण्याचे मला अजिबात दु:ख वाटत नाही. चांगली भूमिका मिळण्यासाठी ठरावीक काळ जावा लागतो.

‘इडक’ हा करोनाकाळात ओटीटीवर प्रदर्शित झालेला पहिलाच मराठी चित्रपट आहे. ‘ओव्हर द टॉप म्हणजेच ओटीटी हे माध्यम प्रेक्षकांसाठी वरदानच आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत नावारूपास आलेल्या या माध्यमाचे मी स्वागतच करतो. यामुळे कलाकाराचे काम जगभरात पोहोचले जाते’, असे मत संदीपने व्यक्त केले. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता शरद केळकर निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. शरद केळकरने मला या भूमिकेसाठी विचारणा केल्यावर मी लगेच होकार दिला. निर्माता म्हणून त्याचे नियोजन चोख असल्याचे संदीप सांगतो.

इडक्या हाच चित्रपटाचा खरा हिरो

चित्रीकरणादरम्यान मला बक ऱ्याचा लळा लागला होता. आम्ही त्याला इडक्या नावाने हाक मारत होतो. सेटवर इडक्याची बडदास्त ठेवली जात असे. शंकरअण्णा नावाच्या गृहस्थांनी त्याची विशेष काळजी घेतली. त्या बक ऱ्यासाठी छोटय़ा वातानुकूलित व्हॅनिटी व्हॅनची सोय केली होती. चित्रीकरण सुरू असताना दोन दिवस आजारी असल्याने त्याला विश्रांतीही दिली होती. त्यामुळे तो आजारी असताना आम्ही आमचे चित्रीकरण उरकले, अशी चित्रकरण करतानाची आठवण त्याने सांगितली. चित्रपटात मी नायक असलो तरीही तो कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. तोच खरा हिरो असल्याचे संदीप सांगतो.