मराठीतील अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अश्विनी भावे येत्या २७ सप्टेंबर रोजी अमेरिका दौऱ्याच्यावेळी मोदींचे स्वागत करणार आहेत. कॅलिफोर्निया येथे अमेरिकास्थित भारतीय समाजातर्फे मोदींच्या स्वागतासाठी एका खास समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला तब्बल २०,००० भारतीय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कॅलिफोर्नियाच्या सॅन जोस येथील सॅप केंद्रात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमांच्या आयोजकांमध्ये अश्विनी भावे यांच्यासह पत्रकार राज मथाई, विनोदी कलाकार राजीव सत्याल यांचा समावेश आहे. भारताला अनेक वर्षांपासून ज्या बदलाची प्रतिक्षा होती तो बदल नरेंद्र मोदी यांच्या रूपाने घडला आहे. त्यामुळे अमेरिकेत मोदींचे स्वागत करायला मिळणे, हा माझ्यासाठी बहुमान असल्याची प्रतिक्रिया अश्विनी भावे यांनी व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेसाठी मोदी न्यूयॉर्कमध्ये उपस्थित राहणार असून त्यानंतर शनिवारी आणि रविवारी ते कॅलिफोर्नियाला जाणार आहेत