चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या प्रत्येक कलावंताला नेहमी मोहवणारी गोष्ट म्हणजे ‘दिग्दर्शकाची खुर्ची’. चित्रपटाच्या सेटवर गेल्यावर ‘Director’ अशी अक्षरे असलेली काळी कापडी खुर्ची. याचं खुर्चीवर क्रांती विराजमान झाली आहे. ‘सून असावी अशी’ या आपल्या पहिल्या-वहिल्या चित्रपटाने क्रांती रेडकरने चित्रपटसृष्टीतील अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर ‘शहाणपण देगा देवा’ , ‘ऑन ड्युटी २४ तास’, ‘जत्रा’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘नो एट्री पुढे धोका आहे’, ‘पिपाणी’ यासारख्या एकापेक्षा एक सरस चित्रपटांमधून क्रांतीने आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली. ‘कोंबडी पळाली’ या तिच्या दिलखेचक नृत्यावर तर तिने तमाम रसिकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावला. अभिनेत्री, नृत्यांगना म्हणून नावाजलेली क्रांती आता दिग्दर्शक म्हणूनही नावाजली जाण्याच्या वाटेवर आहे.
‘काकण’ या चित्रपटाद्वारे तिने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. काही कारणास्तव तरुणपणी वेगळे झालेले प्रेमीयुगुल हे वयाच्या ५०व्या वर्षी एकत्र येतात, यावर ‘काकण’ची कथा आधारित आहे. याचे चित्रीकरण कोकण आणि मुंबई येथे करण्यात आले असून, यात उर्मिला कानेटकर व जितेंद्र जोशी यांच्या भूमिका आहेत. केवळ २६ दिवसांमध्येच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर आता क्रांती चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरविण्यात व्यस्त आहे. ‘काकण’मध्ये क्रांतीचा लहान भाचा आकाश बॅनर्जी यानेही काम केले आहे. लहान मुलांसोबत काम करणे फार कठीण काम आहे. ते कधीच कोणाचे ऐकत नाहीत आणि स्वतःच्या मनाला वाटेल तेच करतात, असे क्रांती म्हणाली. ‘काकण’व्यतिरीक्त क्रांती दिग्दर्शित करणार असलेला अजून एक चित्रपट याचवर्षी प्रदर्शित होणार असल्यामुळे ती फार उत्सुक आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणास ऑक्टोबरमध्ये सुरुवात होणार आहे. हा एक विनोदीपट असून, यात क्रांतीदेखील काम करणार असल्याचे ती म्हणाली. कृष्णराज फिल्म्स निर्मित ‘काकण’ यावर्षी ऑगस्टमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.