गोव्यातील चापोली धरणावर आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी मॉडेल व अभिनेत्री पूनम पांडेला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या व्हिडीओच्या शूटिंगदरम्यान तिथे उपस्थित असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. तर अश्लील व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला शाखेने पूनम पांडेविरोधात गोव्याकील पोलीस स्थानकांत तक्रार दाखल केली होती. गोव्यामध्ये सरकारी जमिनीवर अश्लिल व्हिडीओ शूट करण्याची संमती कोणी दिली? भाजपा गोव्याला पॉर्न डेस्टिनेशन करु पाहतेय का? असे सवाल करत त्यांनी पूनमवर जोरदार टीका केली होती. गोवा फॉरवर्ड महिला शाखेच्या अध्यक्षा अश्मा सय्यद यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

लग्नानंतर पतीकडून झाली होती मारहाण

पूनम पांडेला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तसेच तिला मारहाण केल्याप्रकरणी आणि विनयभंग केल्याप्रकरणी तिचा नवरा सॅम बॉम्बेला अटक करण्यात आली होती. गोवा पोलिसांनीच ही कारवाई केली होती. १२ सप्टेंबर रोजी या दोघांनी लग्न झाल्याची माहिती सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन दिली होती.