१९८२ पासून आमच्याकडे गणपती येत आहे. लक्ष्मीकांतच्या आईंनी पहिल्यांदा १९८२ मध्ये घरी गणपती आणला. नंतर लक्ष्मीकांत यांनीही स्वतंत्र गणपती आणला. गिरगावच्या मुळ घरी तर गणपती येतच होता शिवाय आमच्याकडेही येत होता. लक्ष्मीकांत गेल्यानंतरही मी १२ वर्ष गणपती घरी आणला. पण आता आम्ही परत संपूर्ण बेर्डे कुटुंबाने सगळ्यांचा मिळून एकच गणपती ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण एवढा व्यस्त असतो की कुटुंबातल्या इतरांसाठी खास वेळच काढता येत नाही. पण सणांच्या दिवसात मात्र सगळी भावंड, नातेवाईक एकत्र येतात आणि चार आनंदाचे क्षण अनुभवतात हे महत्त्वाचं. आम्ही संपूर्ण बेर्डे कुटुंब गणेशोत्सवामध्ये एकत्र येतो आणि मग गप्पा, गाणी, जेवण याच्यात गणतपीचे दिवस कधी निघून जातात कळतही नाहीत. मोदक, खीर, पुरणपोळी यांसारख्या पदार्थांवर ताव मारायचा आणि सोबतीला हास्य विनोद तर आहेतच.
मला सजावटीपेक्षा गणेशाची मूर्तीच अधिक मोहक वाटते. फार सजावट मला आवडत नाही. खूप सजावट करायची आणि त्यात जर गणेश मूर्तीच दिसणार नसेल तर त्या सजावटीचा काय उपयोग. त्यापेक्षा मूर्तीला साजेशा मोहक सजावटीला मी अधिक प्राधान्य देते. आम्ही फिरता गणपती ठेवला असल्यामुळे यावर्षी रविंद्र बेर्डे यांच्याकडे गणपती आहे. यावर्षी कितीतरी वर्षांनी मी माझ्या मित्र-परिवाराच्या घरी गणपती पाहायला गेले. शाळेतले मित्र परिवारांच्या घरी जाऊन आले. गणपतीचे हे दिवस मी खूप एन्जॉय करते. शेवटी बाप्पासाठी आपण काय करतो काय नाही यापेक्षा किती श्रद्धेने करतो हे महत्त्वाचे.