‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ म्हणणारा गणेश गायतोंडे अखेर परत येणार आहे. सेक्रेड गेम्स २ या वेब सीरिजशी संलग्न असलेल्या दोन व्यक्तींवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप होते. त्यामुळे सेक्रेड गेम्स २ च्या निर्मितीवर देखील टांगती तलवार होती. मात्र आता नेटफ्लिक्सनं सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझन होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर असलेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपामुळे फँटम फिल्म ही कंपनी बंद करण्याचा निर्णय दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीनं घेतला. हे तिघंही ‘फँटम फिल्म’ बॅनर अंतर्गत काम करत होते. विक्रमादित्य आणि अनुरागनं सेक्रेड गेम्स च्या पहिल्या सिझनचं दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळे विकास बहलसोबत भागीदारी असल्यानं विक्रमादित्य आणि अनुरागसोबत काम करावं की नाही याचा विचार नेटफ्लिक्स कंपनी करत होती.  मात्र स्वतंत्र चौकशी पार पडल्यानंतर नेटफिक्सनं अनुराग आणि विक्रमादित्य सोबत पुन्हा एकदा काम करण्याचं ठरवलं आहे. तर दुसरीकडे या सीरिजचा लेखक वरूण ग्रोवरलाही नेटफ्लिक्सनं हिरवा कंदील दिला आहे. वरुणवरदेखील लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप होते. त्याचीही नेटफ्लिक्सकडून चौकशी करण्यात आली. त्यामुळे समाधानकारक उत्तर मिळाल्यानंतर नव्या सीरिजसाठीदेखील लेखन हा वरूण ग्रोवरच करणार असल्याचं नेटफ्लिक्सनं म्हटलं आहे. तेव्हा  सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनच्या भविष्यावर असणारं अनिश्चिततेचं सावट आता दूर झालं आहे.

सेक्रेड गेम्स ही विक्रम चंद्रा यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारीत असली तरी ती प्रचंड गाजायचं कारण म्हणजे यामधले सेक्स सीन्स आणि अत्यंत अश्लील भाषेतले संवाद. भारतातल्या सेन्सॉर बोर्डाचे कुठलेही नियम न पाळता केवळ नेटफ्लिक्स या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरून प्रसारण होत असल्याने त्याचा पुरेपूर फायदा घेण्यात आला आहे. या वेबसिरीजवर बंदी घालण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे, तसेच कोर्टातही दावे दाखल करण्यात आले आहेत.