News Flash

वीस वर्षांपूर्वीचा ‘गोलपिठा’ पुन्हा रंगभूमीवर

मराठी रंगभूमीवर सध्या पुनरुज्जीवीत नाटकांची रांगच्या रांग लागली आहे. या रांगेतच आणखी एक नाटक समाविष्ट होत आहे. वेश्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे आणि एका विदारक जीवनाचे

| May 30, 2013 04:44 am

मराठी रंगभूमीवर सध्या पुनरुज्जीवीत नाटकांची रांगच्या रांग लागली आहे. या रांगेतच आणखी एक नाटक समाविष्ट होत आहे. वेश्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे आणि एका विदारक जीवनाचे वास्तव मांडणारे नव्वदीतील ‘गोलपिठा’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. सुरेश चिखले लिखित हे नाटक वीस वर्षांपूर्वी मिलिंद पेडणेकर यांनी दिग्दर्शित केले होते. विशेष म्हणजे आताही पेडणेकरच हे नाटक पुन्हा घेऊन येत आहेत. वीस वर्षांपूर्वी हे नाटक जसे सादर झाले होते, तसेच आताही होणार आहे. रविवार, २ जून रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पुण्यात बालगंधर्व नाटय़गृहात होणार आहे.
गेल्या वीस वर्षांमध्ये सभोवताल बदलला असला, तरी अलेक्झांड्रा चित्रपटगृहाजवळचा गोलपिठा मात्र तस्साच आहे. तेथे बोलली जाणारी भाषा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जशीच्या तशी पुढे सरकली आहे. फक्त त्या वेळी पन्नास रुपयांमध्ये धंदा करायला तयार होणारी वेश्या आता ६० रुपये घेते. म्हणजे गेल्या वीस वर्षांत त्यांच्यासाठी काळ केवळ दहा रुपयांनीच पुढे सरकला आहे, असे लेखक सुरेश चिखले यांनी सांगितले.
नाटकाच्या नेपथ्यापासून दिग्दर्शनाच्या जागांपर्यंत सर्व नाटक वीस वर्षांपूर्वी बसवले होते, तसेच आहे. या मोहल्ल्यात वाजणारी गाणी तेवढी बदलली आहेत. मात्र तो काळ जपण्यासाठी आम्ही त्या वेळचीच गाणी कायम ठेवली आहे, असे दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर यांनी सांगितले. या नाटकात आम्ही एक नवे गाणे टाकले आहे. या गाण्याला अशोक पत्की यांनी संगीत दिल्याची माहितीही पेडणेकर यांनी दिली. इंग्रजांनी या वेश्यांच्या घरांना दिलेले क्रमांकही अजून तेच आहेत. ती घरेही तशीच आहेत. त्यामुळे नाटकाच्या मांडणीत बदल करणे आपल्याला पटले नाही, असे ते म्हणाले.
या नाटकात सुरेखा कुडची, हेमंत भालेकर यांच्यासह प्रियांका वामन, नेत्रा अकुला, काव्या माने, श्वेता म्हात्रे, विशाखा दरेकर, अनघा देशपांडे, अजित सावंत, अमेय बोरकर, दुर्गेश आफेरकर, दिवाकर मोहिते आदी कलाकार काम करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2013 4:44 am

Web Title: after twenty long years golpitha back on stage
टॅग : Marathi Play
Next Stories
1 जून्या गाण्यांचा गंध नव्या रूपात
2 धूम-३ चित्रपटाच्या उपग्रहाव्दारे प्रक्षेपण अधिकारांची ७५ कोटींना विक्री?
3 सलमानबरोबर काम करायची संधी मिळाली हा नशिबाचा भाग – जॅकलीन
Just Now!
X