सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत व्यक्त होण्यासाठी सहज उपलब्ध असलेलं माध्यम म्हणजे सोशल मीडिया. एखाद्याचं कौतुक करण्यापासून ते ट्रोल करण्यापर्यंत सर्व गोष्टी सोशल मीडियावर सर्रास पाहायला मिळतात. त्यातही सेलिब्रिटी किंवा स्टारकिड म्हटलं की हे प्रमाण अधिक पाहायला मिळतं. अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल होते. अजयचे वडील आणि न्यासाचे आजोबा वीरू देवगण यांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी न्यासाला पार्लरबाहेर पाहिलं गेलं. त्यावरून तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. न्यासाचं पार्लरमध्ये जाण्यामागचं कारण अखेर अजयने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

“वडिलांच्या निधनानंतर घरी फार दु:खाचं वातावरण होतं. न्यासा दिवसभर रडत होती. घरी बरेच लोक येत होते. मला आणि काजोलला त्यांच्याकडे लक्ष देणंही भाग होतं. त्यामुळे मीच न्यासाला म्हटलं होतं की तू थोडावेळ बाहेर जा. ती बाहेर जायला तयार नव्हती पण तिचा मूड ठीक व्हावा म्हणून मीच आग्रह करत होतो. कुठे जावं हे तिला माहितीही नव्हतं. ती घरातून निघाली आणि पार्लरमध्ये गेली. पार्लरमध्ये जातानाचे तिचे फोटो काढले गेले आणि सोशल मीडियावर ते व्हायरल झाले. आजोबांचं निधन झालं आणि न्यासा पार्लरमध्ये गेली, अशा शब्दांत तिच्यावर टीका होऊ लागली. अशा लोकांना काय हक्क आहे? ती मानसिक धक्क्यात होती आणि मी तिला बाहेर जायला सांगितलं होतं. अशा मुलीला ट्रोल करणं खरंच खूप वाईट आहे. ते फोटो पाहिल्यानंतर ती रडत रडत घरी आली होती”, असं त्याने सांगितलं. “नऊ, दहा, पंधरा वर्षांच्या मुलांना ट्रोल केलं जातं. ट्रोल करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला”, असा सवाल अजयने केला.

आणखी वाचा : चौथीत असताना सलमानची शाळेतून हकालपट्टी करण्यात आली होती; कारण…

अजयचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट पुढच्या वर्षी १० जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीनिमित्त दिलेल्या मुलाखतीत अजयने ट्रोलिंगविषयी वक्तव्य केलं.