सध्या संपूर्ण देशात करोना व्हारसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीने चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी वेगळा मार्ग निवडला आहे. अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आहे. नुकताच सात नवे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली. पण हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटाचे हक्क हे कोट्यावधी रुपांना विकण्यात आले आहे.

अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब, अजय देवगणचा ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’, आलिया भट्टचा ‘सड़क 2’, अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’, कुणाल खेमूचा कॉमेडी चित्रपट ‘लूटकेस’, विद्युत जामवालाचा ‘खुदा हाफिज’ आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हे चित्रपट डिझनी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहेत. हे सर्व चित्रपट घरी बसल्या पाहता येणार असल्यामुळे चाहते आनंदी असल्याचे दिसत आहे.

पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटाचे हक्क १२५ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. तर भुज या चित्रपटाचे हक्क ११२ कोटी रुपयांना विकले असल्याचे समोर आले आहेत. या बाबत टी-सीरिजने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असलेल्या चित्रपटांचा प्रेक्षकांना फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला मिळणार आहे.