अक्षय कुमार त्याच्या प्रत्येक सिनेमात काही ना काही नवं करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या आगामी सिनेमात तो आपल्या लूकसोबतही नवीन प्रयोग करताना दिसणार आहे. असे म्हटले जाते की, अक्षयने त्याचे केस ‘केसरी’ या त्याच्या आगामी सिनेमासाठी कापले. अक्षयने अचानक केस का कापले हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. यावेळी अक्षय हेअर ट्रान्सप्लान्टची ट्रिटमेन्ट घेत असल्याचे वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झाले होते. पण या संदर्भात अक्षयने स्पष्टीकरण देत म्हटले की, त्याच्या आगामी ‘केसरी’ सिनेमासाठी त्याने केस कापले आहेत. ‘केसरी’ सिनेमात त्याला फार जड पगडी घालावी लागते. ही पगडी घालणं फार कठीण आहे. यामुळेच त्याने केस कापले.

काही दिवसांपूर्वी ‘केसरी’ सिनेमातील अक्षयचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला होता. या फोटोमध्ये अक्षयने नारंगी रंगाची भली मोठी पगडी घातली होती. अक्षयने त्याचा हा लूक सोशल मीडियावर शेअर करत म्हटले की, ‘हा फोटो शेअर करताना फार अभिमान वाटत आहे.’
२५ जानेवारीला अक्षयचा ‘पॅडमॅन’ सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमात अक्षयसोबत राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘पॅडमॅन’ सिनेमाशिवाय अक्षयचे यावर्षी ‘केसरी’ आणि ‘गोल्ड’ हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. ‘गोल्ड’ सिनेमातून टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.